Pune: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातही करोना चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातही करोना निदान चाचणी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करोना तपासण्यांची क्षमता प्रतिदिन 100 वरून 2,200 पर्यंत वाढविण्यात येत आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबई आणि पुणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या चाचणी केंद्रामुळे सहाशे चाचण्या करण्याची सुविधा नव्याने निर्माण होणार आहे. खाजगी केंद्रांमधून दररोज सातशे तपासण्या होतील. त्याचप्रमाणे लवकरच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रातून ८०० चाचण्या अशा एकूण बावीसशे करोना चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

शासकीय रुग्णालयाच्या चाचणी केंद्रांना नव्याने मान्यता देण्याबरोबरच मुंबईतील सात खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तत्वतः मान्यता दिली आहे. दररोज प्रत्येकी १०० नमुने तपासण्याची या चाचणी केंद्रांची क्षमता आहे. काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.