Pune: जनता संचारबंदीनंतर आता ‘लॉकडाऊन’ आणि जमावबंदी!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 22 तासांची जनता संचारबंदी आज (सोमवारी) आज पहाटे पाच वाजता संपली असली तरी राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन आणि शहरी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असला जनजीवन पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार आहे. 

राज्य शासनाने वाढविलेली जनता कर्फ्यूची मुदत आज पहाटे संपल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निर्मनुष्य रस्त्यांमध्ये पुन्हा जान आली असली तरी रस्त्यांवर दिसणारे नागरिक आणि वाहनांची संख्या नेहमीपेक्षा खूपच कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक सुरू झाली आहे. टोलनाक्यांवर वाहनांच्या रांगा पुन्हा दिसू लागल्या आहेत. संचारबंदीमुळे अनेकजण काल दिवसभर एकाच ठिकाणी अडकून पडले होते. पुढील काही दिवसांचा विचार करून घरी किंवा सुरक्षित ठिकाणी पोहचण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसल्याने नागरिकांनी 31 मार्चपर्यंत शक्यतो घरामध्येच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपोआपच सर्वांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत.

भाजीपाला, दूध यांची पुरेशी आवक शहरात झालेली नाही. नेहमीपेक्षा जेमतेम 35-40 टक्केच माल आल्यामुळे काहीशी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून भाजीपाला 25 ते 30 टक्के महागण्याची शक्यता आहे.

राज्यात शहरी भागांत (ग्रामपंचायत क्षेत्र वगळता) जमावबंदी आदेश लागू असल्याने चारपेक्षा अधिकजणांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे हा गर्दी टाळण्यासाठी शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे.  दोन व्यक्तींनी घरात देखील एकमेकांपासून किमान तीन फुटांचे अंतर ठेवून कोरोनापासून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.