Pune : ‘नवीन जीएसटी रिटर्न’मुळे छोट्या व्यावसायिकांना दिलासा -कृष्णा मिश्रा

एमपीसी न्यूज – “वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परतावा धोरण अधिकाधिक सहज व सोपे करण्याच्या हेतूने ‘नवीन जीएसटी रिटर्न’ धोरण तयार करण्यात आले आहे. येत्या 1 एप्रिलपासून ही नवी व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. तिमाही जीएसटी भरण्याच्या सुविधेसह प्रणालीतील सुसूत्रता यामुळे करदात्यांना दिलासा मिळणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मुख्य कर आयुक्त कृष्णा मिश्रा यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे विभाग आणि केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीएसटी न्यू रिटर्न्स’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत कृष्णा मिश्रा बोलत होत्या.

बिबवेवाडी येथील ‘आयसीएआय’ भवन येथे झालेल्या कार्यशाळेवेळी वस्तू आणि सेवा कर पुणे विभाग-१चे आयुक्त अतुल कुमार गुप्ता, पुणे विभाग -२चे आयुक्त राजीव कपूर, उपायुक्त सीजीएसटी पुणे आकाश चौगुले, उपायुक्त सीजीएसटी पुणे रोहित निगवेकर, अधीक्षक अतुल कुमार श्रीवास्तव, ‘आयसीएआय’ पुणेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, उपाध्यक्ष सीए समीर लढ्ढा आदी उपस्थित होते.

कृष्णा मिश्रा म्हणाल्या, ”येत्या काळात लागू करण्यात येणारी नवीन जीएसटी रिटर्न व्यवस्था अधिक सोपी असेल आणि छोट्या व्यवसायांना कर परतावा करणे सुलभ जाईल. नवीन जीएसटी रिटर्नमध्ये जीएसटी मासिक, तसेच त्रैमासिक दाखल करता येईल. छोट्या व्यवसायांसाठी हे उपयुक्त ठरणार असून, यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात ही कार्यशाळा घेण्यात येत आहे, याचा फायदा होईल. त्यामुळे यंत्राने मधील त्रुटी समजून घेण्यास मदत होईल.”

सीए अभिषेक धामणे म्हणाले, “सीए आणि त्यांच्याशी संलग्नित करदात्यांना या कार्यशाळेचा फायदा होईल. सरकारकडून राबविण्यात येत असलेली नवनवीन धोरणे, प्रणाली सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या वतीने नियमित पुढाकार घेतला जातो. मुख्य आयुक्ताशी चर्चा करून भविष्यात एक मोठा आउटरीच कार्यक्रम घेणार आहोत. ज्यातून सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना जीएसटीविषयी अधिक जागृत करण्यास मदत होईल.”

कार्यशाळेत आकाश चौगुले व अमितकुमार श्रीवास्तव यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या साह्याने नवीन जीएसटी रिटर्नबद्दल माहिती दिली. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जीएसटी परतावा भरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सीए समीर लढ्ढा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. कार्यशाळेत २५० पेक्षा अधिक सीए, टॅक्स प्रॅक्टिशनर्स सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.