Chinchwad : गुन्हे शाखेचा मसाज सेंटरवर छापा; तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या ‘युनिट एक’ने चिंचवड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारला. यामध्ये तीन तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 3) दुपारी करण्यात आली.

शॉम्पा कौशिक घोष (वय 34, रा. मारुंजी, ता. मुळशी), अभिजित शिंगोटे पाटील (रा. डांगे चौक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार उषा दळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थरमॅक्स चौकाजवळ असलेल्या सुमन मॉलच्या पहिल्या मजल्यावर सिटी सृष्टी मसाज सेंटर नावाने मसाज सेंटर सुरु होते. मसाज सेंटरच्या नावाखाली आरोपी आपसात संगनमत करून तीन तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यासाठी ग्राहक मिळवून देण्याचे काम आरोपी करीत होते. त्यातून मिळणारी काही रक्कम स्वतःकडे ठेऊन त्यावर आपली उपजीविका भागवत होते.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली. एका महिलेसह दोन जणांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 370, 34 आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.