Pune News: महावितरण कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी 104 लसीकरण केंद्र उपलब्ध

एमपीसी न्यूज – महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घेण्यासाठी शहरात 104 लसीकरण केंद्रांमध्ये सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 5 लसीकरण केंद्र 24×7 सुरु राहणार असून उर्वरित 43 शासकीय तर 56 खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील या केंद्रात लस घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामध्येही महावितरणकडून वीजग्राहकांना अविरत व अहोरात्र सेवा देण्यात येत आहे. सोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांची तसेच पुणे महापालिका व जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पाठपुरावा केला. त्याप्रमाणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी 104 लसीकरण केंद्रात लस देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यामध्ये मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल, येरवड्यातील स्व. राजीव गांधी रुग्णालय, कोथरूडमधील कै. जयाबाई नानासाहेब सुतार प्रसुतिगृह, वडगाव धायरीमधील कै. मुरलीधर पांडुरंग लायगुडे हॉस्पिटल आणि हडपसरमधील कै. अण्णासाहेब मगर प्रसुतिगृह या रुग्णालयांमध्ये 24×7 लसीकरणाची सोय उपलब्ध आहे.

तर 43 शासकीय व 56 खासगी रुग्णालयांच्या केंद्रांमध्ये सोमवार ते शनिवार सकाळी 9.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लस देण्यात येईल. या सर्व लसीकरण केंद्रांची यादी महावितरणच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे ओळखपत्र व आधार कार्डसह संबंधीत लसीकरण केंद्रात जाऊन कोरोना विषाणू प्रतिबंधक लस घ्यावी तसेच कार्यालयीन व ग्राहकसेवेचे कर्तव्य बजावताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.