Pune News: दिवाळीत पुणे ,पिंपरी चिंचवडमध्ये 12 हजार वाहनांची विक्री, यंदा इलेक्ट्रीक बाईक्स सुसाट!

एमपीसी न्यूज – पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत असल्याने सध्या एक नवीन ट्रेंड बघायला मिळतोय. आता ग्राहकांचा पेट्रोल बाइक किंवा स्कूटरऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. हा कल यंदाच्या दिवाळीत देखील पाहायला मिळाला. पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांनी यंदा दिवाळीत 710 ई बाईक खरेदी केल्या आहेत.

यंदा दिवाळीनिमित्त विविध वस्तू खरेदीवर करोडो रुपयांची उलाढाल झाली. यात दुचाकी तसेच चारचाकी वाहन खरेदीचे प्रमाणही अधिक होते. पाडव्याचा मुहूर्त साधत पुणेकरांनी यंदा तब्बल 7 हजार 769 तर पिपरी- चिंचवडकरांनी 4 हजार 669 वाहनांची खरेदी केली. यात यंदा सर्वाधिक दुचाकी वाहनांची खरेदी-विक्री झाल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडे यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वाहनांची नोंद करण्यात आली आहे. त्या नोंदीनुसार यंदाची वाहन खरेदीची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यात यंदा 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत पुणे आरटीओत एकूण 7 हजार 769 वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 873 दुचाकी तर, 2 हजार 365 चारचाकी वाहनांचा समावेश असून इतर उर्वरित वाहने आहेत.

तसेच, पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 4 हजार 669 वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये सर्वाधिक 2 हजार 807 दुचाकी तर, 1 हजार 476 चारचाकी वाहनाचा समावेश असून इतर उर्वरित वाहने आहेत. यातून पुणे आणि पिंपरी चिंचवड आरटीओला अनुक्रमे 45 कोटी 48 लाख आणि 25 कोटी 85 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.

ई-बाईकची विक्रीची आकडेवारी

पुणे – 433
पिंपरी – 277
एकूण – 710

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.