Pune News : तरुणांच्या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा – किरण साळी

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या काळात पालिका देत असणारी ही वागणूक अत्यंत वेदनादायी आणि लाजीरवाणी असून तरुणांच्या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा अशी मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख किरण साळी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

देशभरासह पुण्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. देशात एक मेपासून 18-45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानंतरही पुण्यात तरुणांसह ज्येष्ठांनाही लस मिळताना दिसत नाही. तरुण आणि ज्येष्ठ कोरोना लसीकरण केंद्रांवर दिवसभर रांगा लावून बसून असल्याचे चित्र शहारात सर्वत्र दिसत आहे.

पालिकेकडून शहरात एकूण 110 लसीकरण केंद्र सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी केवळ पाचव केंद्रावर 18-45 या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होत असल्याचे समोर आले आहे. तरुण दिवसभर लसीकरण केंद्रांवर रांगा लावत आहेत. तरीही लस मिळत नाही. आरोग्य सेतू आणि कोवीन अ‍ॅपवर लस घेण्यासाठी नोंदणी करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे नोंदणी अ‍ॅपवरील अडथळे तत्काळ दूर करण्यात यावेत, 5 मे रोजी शहरात 18-45 वयोगटातील फक्त 2080 जणांचे लसीकरण झाल्याचे समोर आले आहे. या गतीने लसीकरण केल्यास शहरातील सुमारे वीस लाख तरुणाईचे लसीकरण करण्यास पाच-दहा वर्षेही पुरणार नाहीत, अशी भीषण स्थिती आहे.

एकीकडे पुण्यातून सर्व जगाला लस पुरविली जात आहे आणि दुसरीकडे पुण्यातच लस मिळत नाही, हा विरोधाभास पहिला मिळत आहे. पालिकेने लसीसाठी केंद्रावर अवलंबून न राहता, लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी बोलून अतिरिक्त लस उपलब्ध करून वेगाने लसीकरण करावे.

सुप्रीम कोर्ट मुंबईतील कोरोना उपाययोजनांचे दाखले देशातील विविध राज्यांना देत आहे. मुंबई पॅटर्नचा अभ्यास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबईत तरुणांचे लसीकरण वेगाने सुरू आहे. मग पुणे महापालिका तरुणांबाबत उदासीन का आहे. तरुणांच्या जीवाशी का खेळत आहे. तरुणांच्या जीवाची पालिकेला पर्वा का नाही, असा आर्त प्रश्न आज पुणेकर तरुणाई विचारत आहे. पालिकेने तातडीने अतिरिक्त लस उपलब्ध करून वेगाने लसीकरण मोहीम राबवून पुणेकरांना कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढावे, अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे आयुक्तांनकडे केली आहे. याबाबत आयुक्तांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.