Pune News : महा मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नवी मुंबई मेट्रोचे परिचालन आणि मेंटेनेंस करणार महा मेट्रो

एमपीसी न्यूज – महा मेट्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत गाडी संचालनाचे आणि मेंटेनेन्स चे काम आता महा मेट्रो प्रशासनाकडे सोपवण्यात आले असून, महा मेट्रोने त्या दृष्टीने तत्परतेने तयारी देखील सुरु केली आहे.

नवी मुंबई मधील मेट्रो प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या सिटी अँड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (सिडको) ने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ला मार्गिका क्रमांक 1 वर मेट्रो गाडी चालवण्याची आणि मेंटेनेन्सची जवाबदारी दिली आहे. पुढील 10 वर्षांकरिता महा मेट्रोला या मार्गिकेवर मेट्रो गाडी चालवण्यासंबंधीचे काम मिळाले आहे. महत्त्वाचे म्हणजे याच मार्गिकेचे उर्वरित काम पूर्ण करण्याचे कंत्राट महा मेट्रोला मिळाले आहे.

अभियांत्रिकी साहाय्यासाठी महा मेट्रोची नियुक्ती या आधीच करण्यात आल्यानंतर आता परिचालन आणि देखभाल सुविधा पुरवण्याकरिता सिडको कडून महा मेट्रोला स्वीकार पत्र देण्यात आले आहे. लवकरच या महा मेट्रो आणि सिडको दरम्यान या संबंधी करार होणार आहे.

नवी मुंबई हे राज्यातील तिसरे शहर आहे जेथे महा मेट्रो असा प्रकल्प राबवते आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे काम सुमारे 92% झाले असून दोन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु आहे. उर्वरित दोन मार्गिकेचे काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या खेरीज पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम 58 टक्के पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या दोनही मार्गिकेवर मेट्रो ट्रायल रन झाली असून पुण्यात येत्या काही महिन्यात मेट्रो सेवा सरूँ होनार आहे. तसेच महा मेट्रोने डिझाईन केलेल्या नाशिक मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार महत्वाच्या शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवणार आहे. या शिवाय महा मेट्रोने ठाणे आणि तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मेट्रो प्रकल्पाकरता सविस्तर प्रकल्प अहवाल (Detailed Project Report – DPR) तयार केला आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये सिडको आणि महा मेट्रो दरम्यान करार झाल्यावर मार्गिका क्रमांक 1 वरील उर्वरित कामाचे कंत्राट मिळाले होते. बेलापूर ते पेंढारी स्थानकापर्यंत हि मार्गिका असून या दरम्यान 11 स्थानके आहेत. या मार्गिकेची लांबी 11 किलो मीटर असून यात तळोजा येथे मेंटेनन्स डेपो आहे. पंचानंद आणि खारघर येथे दोन ट्रॅकशन सब-स्टेशन आहेत. या मार्गिकेवरील काम पूर्ण वेगाने सुरु असून ठरवल्या वेळापत्रकाप्रमाणे हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाकरिता महा मेट्रोने वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त केले असून प्रमुख अभियंताचा पदभार देखील सांभाळला आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात सुरु करण्यासंबंधी निर्णय झाला असून पहिल्या भागात स्टेशन क्रमांक 7 ते 11 दरम्यानचे काम प्रार्थमिकतेने केले जाणार आहे. ट्रॅकचे उर्वरित काम महा मेट्रोने पूर्ण केले असून आता ट्रॅक चे काम 100 % झाले आहे. याच प्रमाणे 11 किलोमीटर (दोन्ही बाजू मिळून 22 किलोमीटर) लांबीचे ओव्हर हेड इक्विपमेंट (OHE) चे काम देखील पूर्ण झाले आहे. मेट्रो गाडीच्या ट्रायल रन करता आता तयारी सुरु झाली आहे.

डेपो मध्ये मेट्रो गाड्यांची तपासणी सुरु असून त्याकरता एक किलो मीटर लांबीचा ट्रॅक देखील तयार करण्यात आला आहे. सेंट्रल पार्क स्थानकापर्यंत मेट्रो गाड्यांची तपासणी झाली असून RDSO च्या मान्यते करता मेन लाईन वर देखील नियमित तपासणीचे काम सुरु आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.