Pune News: स्वस्त दरातील वीज खरेदीसाठी कंपनी स्थापन करण्यास मान्यता

एमपीसी न्यूज: एनर्जी इफीशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील कंपनीची उपकंपनी असणार्या कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस कंपनीबरोबर (सीईएसएल) स्पेशल पर्पज व्हेरईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासाठी आणि त्यांच्याकडून स्वस्त दरातील वीज खरेदी करायला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले. या प्रकल्पाच्या एकूण खर्चाची विभागणी ८० टक्के कर्जाद्वारे आणि २० टक्के समभाग अशी आहे. वीस टक्के समभागापैकी किमान २६ टक्के समभाग खर्च महापालिकेला आणि ७४ टक्के समभाग खर्च सीईएसएल कंपनीला करावा लागणार आहे. पन्नास किलो वॅटच्या प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे दोनशे ते अडीचशे कोटी रुपये असणार आहे. त्यापैकी १० कोटी ४० लाख ते बारा कोटी ४८ लाख रुपये इतकी रक्कम महापालिकेने समभाग भांडवल म्हणून द्यावी लागणार आहे. निर्माण झालेल्या वीजेपैकी ५१ टक्के वीज पुणे महापालिकेने वापरणे आवश्यक राहणार आहे.

रासने म्हणाले, एसपीव्ही कंपनीद्वारे उपलब्ध मोकळ्या जमिनीवर ५० मेगावॅटचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मोकळी जमीन सीईएसएल उपलब्ध करून देणार आहे. एसपीव्हीअंतर्गत डिझाईन, उभारणी, चाचणी आदी बाबींचा समावेश असणार आहे. या पक्रल्पातील २० वर्षांसाठीच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे.

रासने पुढे म्हणाले, सध्या सर्व खर्च धरून ७ रुपये २३ पैसे प्रती युनिट दराने वीज खरेदी केली जाते. एसपीव्हीदवारे खुल्या बाजारपेठेत ३ रुपये ४० पैसे दराने वीज उपलब्ध होणार आहे. इतर शुल्काचा एकत्रित विचार करता ही वीज सध्याच्या दरापेक्षा प्रती युनिट ७६ पैशांनी बचत होऊ शकणार आहे. शिवाय एसव्हीपीबरोबर करार करून सध्याच्या दरांपेक्षा कमी दरात वीज मिळणार असून, हे दर वीस वर्षांसाठी कायम राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.