Pune News: पोलीस भरती परीक्षेत डमी विद्यार्थी, स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: पुणे शहरात सुरू असलेल्या पोलीस भरती परीक्षेत डबी विद्यार्थ्याने परीक्षा देण्याचा प्रकार समोर आला. भरारी पथकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. स्वारगेट पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 34 वर्षीय महिला अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. सज्जन कपुरचंद गुसिंगे (वय २८, रा. कौचलवाडी, रोहीतगड. ता. अंबड. जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्या डमी विद्यार्थ्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की मुंबई शहर पोलीस दलातील शिपाई पदाची परीक्षा रविवारी पार पडली. या परीक्षेसाठी काही केंद्र पुणे शहरातही होते. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील क्रिसेंट हायस्कूलमध्ये परिक्षा सुरू असताना भरारी पथकाने या केंद्राला भेट दिली. त्यांना यावेळी सज्जन हा डमी विद्यार्थी असून, तो परिक्षा देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या भरारी पथकाने त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तो मुळ विद्यार्थ्याच्या वतीने परिक्षा देण्यास आला असल्याचे दिसून आले.

तर, तक्रारदार यांनी ओएमआर उत्तरपत्रिका दिलेली असताना त्याने तक्रारदार यांची नजर चुकवून दुसरा ओएमआर शिट नंबरची उत्तरपत्रिका घेतली होती. त्यावर तो परिक्षा देत होता. तक्रारदार या येथे सुपरवायझर म्हणून काम करत होत्या. याप्रकरणी भरारी पथकाने त्याला पकडून स्वारगेट पोलीसांकडे दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तुषार भोसले हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.