Pune News : सहकारनगर दोनमध्ये वीजयंत्रणेला खोदकामाचा तडाखा, दोनवेळा वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – शहरातील सहकारनगर दोनमध्ये पाण्याच्या पाईपलाईनसाठी सुरु असलेल्या खोदकामात महावितरणच्या वीजयंत्रणेला तडाखा बसत आहे. गेल्या 18 तासांमध्ये दोनवेळा सहकारनगर दोनमध्ये दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

पर्वती विभाग अंतर्गत दत्तवाडी उपकेंद्रातून अरण्येश्वर 22 केव्ही उच्चदाब वीजवाहिनीद्वारे सहकारनगर एक व दोन, तुळशीबागवाले कॉलनी, माडीवाले कॉलनी आदी परिसरातील सुमारे 11 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या भूमिगत वीजवाहिनीच्या लगतच पाण्याच्या पाईपलाईनसाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरु आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत संबंधीत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी (दि. 23) सायंकाळी 5 वाजता केलेल्या खोदकामात गणेश मंदिरजवळ ही भूमिगत वाहिनी तोडली. त्यामुळे सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता.

या घटनेनंतर आज सोमवारी (दि. 24) सकाळी 11 च्या सुमारास स्वानंद चौकात जेसीबीने मोठे झाड तोडण्यात आले. मात्र योग्य खबरदारी न घेतल्याने हे झाड महावितरणच्या सहा पोल स्ट्रक्चरवर पडले आणि 6 रोहित्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे सहकारनगर दोनमधील सुमारे 1500 ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित राहिला. खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्यामुळे दुरुस्तीचा आर्थिक भार, वीजविक्रीचे नुकसान झाले असून, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.