Pune News : पुणे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, नदी पात्रातील भराव त्वरित काढा मेट्रोला आदेश

एमपीसी न्यूज – शहरात वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रो कडून करण्यात येत आहे. या मार्गाचा बराचसा भाग नदी पत्रातून जात असून मार्ग निर्मितीसाठी नदी पात्रात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे पावसाळ्यात शहराच्या मध्यभागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा भराव तातडीने काढा असा आदेश जलसंपदा विभागाने पत्रदवारे महामेट्रोला दिला आहे.

शहरात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग एकंदर 31 किमीचा असून त्यात 6 किमी लांबीचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. वनाज- रामवाडी या मार्गांवर मेट्रो मार्गांसाठी खांब उभारण्यात येत आहे.

तसेच डेक्कन जिमखाना, संगम पूल (प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ) आणि बंडगार्डन पूल येथेही नदीपात्रात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी खांब उभारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच त्यावर आता गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नदीपात्रात वाहनांची ये-जा सुरू आहे. ती सुलभ व्हावी, यासाठी तेथे भराव टाकण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावर स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर पुतळा ते शिवाजीनगर न्यायालयापर्यंत मेट्रो मार्ग मुठा नदीच्या पात्रातून जात आहे. हा सुमारे 600 मीटरचा मार्ग नदीतून जात असून त्यावर तीन स्थानके होणार आहे.

तसेच संगमपूल येथे नदीपात्र ओलांडून मेट्रो मार्ग येरवड्याच्या दिशेने जात आहे. तसेच बंडगार्डन येथेही मुळा – मुठा नदीचे पात्र ओलांडून मेट्रो मार्ग रामवाडीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे तेथेही भराव टाकण्यात आला आहे. राज्यात पावसाचे आगमन दरवर्षी 7 जून रोजी होते. हे लक्षात घेऊन नदीपात्रातील भराव काढून टाकण्याची महामेट्रोला आदेश द्यावा, अशी मागणी काही स्वयंसेवी संस्थांनी जलसंपदा विभागाकडे केली होती.

त्याची दखल घेऊन जलसंपदा विभागाने पाहणी केली. त्यानंतर पुणे पाटबंधारे मंडळातील अक्षीक्षक अभियंता सं. द. चोपडे 17 मे रोजी महामेट्रोला पत्र पाठविले. त्यात नदीपात्रातील भराव तातडीने काढून टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच वेळेत हा भराव काढला नाही आणि या बाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल झाल्यास, त्याला जलसंपदा विभाग जबाबदार नसेल, असेही बजावण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.