Pune News : पुणे महानगरपालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा होणार प्रत्यक्ष उपस्थितीत

एमपीसीन्यूज : पुणे महानगरपालिकेची जून महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा (जीबी) ऑफलाईन पद्धतीने (प्रत्यक्ष उपस्थित ) होणार आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये तसेच नवीन इमारतीमध्ये असलेल्या सभागृहात यापुढील काळात या सभा घेतल्या जाणार आहेत. दोन्ही सभागृहात 50 टक्के उपस्थितीच्या नियमाचे पालन करत सर्वसाधारण सभा होणार असल्याची माहिती पालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याबाबत राज्य सरकारने निर्बंध घातले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिकेची सर्व साधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या सभांमध्ये अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे अनेक सभासदांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.

पालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षाच्या सभासदांचा यात समावेश होता. ऑनलाइन सभा घेताना अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटी गायब होत असल्याने अडचणी येत होत्या. इच्छा असून देखील सभासदांना आपले मत, भूमिका मांडताना अडथळे येत होते. पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी सभासदांकडून केली जात होती.

शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध उठविण्यास सुरूवात केल्यानंतर प्रत्येक महिन्यात घेतली जाणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली होती. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देखील देण्यात आले होते. त्यावेळी पवार यांनी नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभा घेण्याबाबत अशी परवानगी द्यावी, अशा सूचना केल्या होत्या.

त्यानुसार गेल्या आठवड्यात पालिकेला ही परवानगी देण्यात आली आहे. सभागृहात एकूण सभासदांच्या 50 टक्के उपस्थितीमध्ये ही सभा घेण्यास तसेच करोनाबाबतच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून सर्वसाधारण सभा घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार पक्ष नेत्यांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून यापुढील काळात ऑफलाईन पद्धतीने सभा घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आणि नवीन इमारतीमध्ये असलेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह या दोन्ही सभागृहात 50 टक्के प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वसाधारण सभा होणार आहेत.

सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्वसाधारण सभा घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार आवश्यक त्या नियमांचे पालन करून या सभा घेतल्या जाणार आहेत. याचे पत्र नगरसचिव कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहे. – गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.