Pune News : सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा ; भारतीय मजदूर संघ

एमपीसी न्यूज – देशातील प्रत्येक कामगाराला किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेची हमी देणारे सोशल सिक्युरिटी व वेज लेबर कोड महराष्ट्रात लागू करा अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. पुण्यात भारतीय मजदूर संघाचे 23 वे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले यावेळी ही मागणी करण्यात आली.

अधिवेशनात नवीन पेन्शन स्कीम रद्द करा , EPF पेन्शन पाच हजार करा, कंत्राटी पद्धत निम योजना रद्द करा यासह विविध मागण्यांचे 10 ठराव मंजूर करण्यात आले. पुढील तीन वर्षांसाठी नवीन पदाधिकारी निवड अधिवेशनात करण्यात आली असून ॲड. अनिल ढुमणे मुंबई अध्यक्ष, मोहन येणुरे , ठाणे यांची सरचिटणीस, किरण मिलगिर ठाणे कोषाध्यक्ष व प्रदेश संघटन मंत्री म्हणून श्रीपाद कुटासकर, औरंगाबाद यांचे सह अन्य अकरा पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

भारतीय मजदूर संघाचे 23 वे त्रैवार्षिक अधिवेशन पुणे येथे आभासी पद्धतीने पार पडले. अधिवेशनात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून 560 निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय मोगल होते.

दोन दिवसीय अधिवेशनात महिलांच्या प्रश्नांनावर विशेष सत्र घेण्यात आले त्यामध्ये अखिल भारतीय सचिव नीलिमा चिमोटे यांनी मार्गदर्शन केले. या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्या या विषयावर एक विशेष चर्चासत्र घेण्यात आले यामध्ये जयंत देशपांडे, अखिल भारतीय शहरी असंघटित प्रभारी व अण्णा धुमाळ अखिल भारतीय औद्योगिक क्षेत्र प्रभारी यांनी मार्गदर्शन केले, मोहन येणूरे यांनी या सत्राचा समरोप केला. विविध ठरावांचे सत्र अनिल ढुमणे यांनी घेतले त्यात बापू दडस, मोहन येणूरे, अर्जुन चव्हाण , सचिन मेंगाळे यांनी विविध ठराव मांडले सत्राचा समारोप सुभाष सावजी यांनी केला.

अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी भारतीय मजदूर संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री सी. व्ही. राजेश यांनी कामगार क्षेत्रासमोरची आव्हाने आगामी काळात तीव्र होणार असून, यापुढे संघटित कामगार क्षेत्रा सोबतच असंघटित क्षेत्रात भारतीय मजदूर संघाने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय केला आहे असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन येणूरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.