Pune News : घटनेच्या चौकटीत जम्मू-काश्मिरचा प्रश्न सोडविला; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

'कलम 370 : नेहरुंपासून मोदींपर्यंत' पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज : ‘जम्मू-काश्मिरचा प्रश्न खूप गुंतागुंतीचा आणि जटील असल्याने कधीही सुटू शकणारा नाही असे सोयीचे राजकीय चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने राजकीय मुत्सद्दीगिरी दाखवत हा प्रश्न घटनेने आखून दिलेल्या चौकटीत सोडविला’ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

‘कलम 370 : नेहरूंपासून मोदींपर्यंत’ या सोमेश कोलगे यांनी लिहिलेल्या, ‘विराट’ प्रकाशनच्या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्रात करण्यात आले. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, लेखक सोमेश कोलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, ‘कलम 370 हटवून जम्मू-काश्मिरात भारतीय संविधान पूर्णतः लागू करण्याचा निर्णय सहजासहजी झाला नाही. संघर्षाचा, आंदोलनांचा आणि टोकाच्या वादविवादाचा मोठा इतिहास आहे. कलम 370 आम्ही पुन्हा लागू करू किंवा 370 विषयीचा निर्णय प्रक्रियेचे पालन करून झालेला नाही,अशा वल्गना करणाऱ्यांनी या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.’

भांडारी म्हणाले, ‘मराठीमध्ये आपले संविधान, संविधानिक इतिहास, घडामोडी अशा विषयांवर फारसे लेखन होत नाही. 370 कलमावर युवा लेखक कोलगे यांनी केलेली विषयाची मांडणी अभ्यासपूर्ण आहे. युवा लेखकांनी संविधानाचा सखोल अभ्यास करून विपुल लेखन करण्याची गरज आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.