Pune News : महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणी मनसे नगरसेवकाला अटक आणि सुटका

एमपीसी न्यूज – प्रभागातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी चालढकल करत असल्याचा आरोप करत क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर आणि त्यांच्या पाच सहकाऱ्यांना वानवडी पोलिसांनी अटक केली.

त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या पाचही जणांची जामिनावर सुटका केली आहे. हा सर्व प्रकार 22 मार्च रोजी झाला होता. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात वानवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांनी तक्रार दिली आहे.

साईनाथ संभाजी बाबर (वय 40), गोरखनाथ अर्जुन इंगळे (वय 29), गणेश सखाराम बाबर (वय 39), अमोल बाळासाहेब शिरस (वय 40) आणि सतीश निवृत्ती शिंदे (वय 41) अशी अटक आणि जामिनावर सुटका झालेल्याची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, साईनाथ बाबर यांनी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयात फिर्यादी हजर नसताना संपूर्ण कार्यालयात कचरा टाकून शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. यावेळी बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोशल डिस्टसिंगचे नियन न पाळत कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते. किशोरी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान बाबर यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. यानंतर वानवडी पोलिसांनी साईनाथ बाबर आणि इतर चार जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. बाबर यांच्यावतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे आणि ऍड. रुपाली पाटील यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.