Pune News : मनसेचे पुन्हा एकदा हटके आंदोलन, आयुक्तांच्या कार्यालयात टाकला कचरा

एमपीसीन्यूज  : घनकचरा विभागाच्या वतीने हडपसर, कोंढवा, रामटेकडी आणि वानवडी परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज अनोखे आंदोलन केले. वानवडी कोंढवा विभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त किशोरी शिंदे यांच्या कार्यालयामध्ये मनसैनिकांनी कचरा टाकला. 

मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

या विषयी बोलताना बाबर म्हणाले, कोंढवा, वानवडी, रामटेकडी, हडपसर या भागातील कचरा दररोज उचलला जात नाही. त्यामुळे या परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचतात. महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या  उपआयुक्तांना आम्ही दोन वेळा निवेदन दिले आहे. प्रभाग समितीमध्येही अनेकदा हा विषय मांडला आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून यावर तोडगा काढण्यात आला नाही.

अशाप्रकारे कचरा साचत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने या भागातील कचऱ्याचे नियोजन न झाल्यास महापालिका आयुक्तांच्या घरात आणि कार्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा  इशाराही बाबर यांनी यावेळी दिला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.