Pune News : पत्रकार रायकर यांच्या मृत्यूबाबत खासदार बापट म्हणाले…!

पांडुरंग यांना कोविड सेंटरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

एमपीसी न्यूज – पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. कोविड सेंटरमधून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेताना वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पांडुरंग यांना कोविड सेंटरमधून खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कोरोनाच्या काळात पोलिस, पालिका, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण काम करत आहेत. मात्र काही जणांच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग सारख्यांचा मृत्यू होत आहे, असे पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले.

खासदार बापट पुढे म्हणाले, मला मंगळवारी रात्री समजलं की पत्रकार पांडुरंग रायकर यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या पत्नी कोविड सेंटरच्या बाहेर थांबलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुण्याच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा केली.

पांडुरंग यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर पांडुरंग यांना कार्डियाक रुग्णवाहिका मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात हलवण्याचे ठरले.

विभागीय आयुक्तांशी बोलुन सुद्धा पांडुरंग यांना कोविड सेंटरमधून खाजगी रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका मिळू शकली नाही. यामध्ये कोणी हलगर्जीपणा केला, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार बापट यांनी केली.

कोरोनाच्या काळात पोलिस, महापालिका आणि वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण काम करत आहेत. मात्र काही जणांच्या हलगर्जीपणामुळे पांडुरंग सारख्यांचा मृत्यू होत आहे. अशांना जाब विचारून कारवाई झाली पाहिजे. यामुळे बाकीचे कामाच्या बाबतीत सावध होतील.

मोठी कोविड सेंटर निर्माण करण्याऐवजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे दवाखाने अपग्रेड करा, अशा सूचना मी केल्या होत्या. त्या सूचना पाळल्या नाहीत. नंतर आम्ही बोललो की म्हणतात याच्यात राजकारण करतात, असेही बापट म्हणाले.

बापट पुढे म्हणाले, रुग्णवाहिकेच्या बाबतीत देखील पीएमपीएलच्या गाड्या रुग्णवाहिका म्हणून तयार करा, अशाही सूचना दिल्या होत्या.

100 कोटी रुपयांचा निधी आणून सेंटरला खर्च करण्याऐवजी दहा-पंधरा दवाखान्यांना प्रत्येकी 10 कोटी दिले असते तर चांगलं झालं असतं.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आणखी काळजी घ्यावी लागेल. आज एका पांडुरंगाच्या बाबतीत असे झाले. इतर अनेक पांडुरंगाची तब्येत बरी नाही, त्यांची प्रकृती खालावली आहे.

सगळ्यांना बरोबर घेऊन काम करताना सूचना देखील पाळल्या गेल्या पाहिजेत. महापौर, आयुक्तांना खासदार म्हणून रुग्णवाहिका खरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र, त्या पाळल्या नाहीत.

त्यामुळे पुढील काळात अधिक सतर्क राहून यापुढे असे घडणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असेही खासदार बापट म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.