_MPC_DIR_MPU_III

Pune News: स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांच्या सभागृहनेतेपदी निवडीने घडला इतिहास!  

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सभागृह नेतेपदी स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक धाडसी निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे. विद्यमान सभागृह नेते धीरज घाटे यांच्या जागी स्वीकृत नगरसेवक गणेश बीडकर यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष स्वीकृत नगसेवक गणेश बीडकर यांना अधिकृत पत्रही पक्षाने दिले असून ते महापालिकेत शुक्रवारी सकाळी (ता. 11) दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सध्या बीडकर हे शहर भाजपच्या सरचिटणीस पदावर आहेत. शहरात भाजपची लाट असताना बीडकर यांचा 2017 च्या पालिका निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची पक्षाने स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली होती. त्या निवडीवेळी पालिकेत मोठा गोंधळ झाला होता. स्वीकृत नगरसेवकपद न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी पालिकेत तोडफोड केली होती. त्यानंतर बीडकर हे दोन वर्षे पालिकेच्या राजकारणात शांतच होते. यानिमित्ताने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत स्वीकृत नगरसेवकाला पद मिळालेले नाही. स्वीकृत नगरसेवकाला सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे अशा सदस्याला पद मिळत नाही, असे ज्येष्ठ नगरसेवक सांगत आहेत. तर, स्वीकृत नगरसेवकाची कोणत्याही पदावर नेमणूक होऊ शकत नाही, असा एकही कायदा नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेत पदाधिकारी बदलाचे वारे सुरू झाले असून त्यात पहिल्या टप्प्यात सभागृह नेते बदलानंतर महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष या पदांवरही नव्या चेहऱ्यांना संधी भाजपा देणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.