Pune News : पुणे विद्यापीठ आणि इंडियन काॅन्सिल फॉर कल्चरल रिलशन्सतर्फे अफगाण विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदत – डॉ. नितीन करमळकर

एमपीसी न्यूज – भारत आणि अफगाण यांच्यातील संबंध घनिष्ठ असून शिक्षणानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन काॅन्सिल फॉर कल्चरल रिलशन्स पूर्ण ताकदीने उभे असल्याची ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि इंडियन काॅन्सिल फॉर कल्चरल रिलशन्सचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज संयुक्तरीत्या दिली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटना कार्यालयात कुलगुरूंची भेट घेतली, त्यावेळी डॉ. नितीन करमळकर बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आणि सरहद संस्थेचे संजय नहार यांच्या पुढाकारातून या औपचारिक भेटीचे आज आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अफगाण विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अफगाण माजी विद्यार्थी संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या हेल्प-लाईनचे कुलगुरूंच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ज्या अफगाण विद्यार्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी तोडगा म्हणून 020-25621938 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठ आणि सरहद संस्था या सर्व कार्यात हातात हात घालून येत्या काळात काम करणार असल्याचे डॉ. नितीन करमळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्र-कुलगुरू एन. एस. उमराणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सरहद संस्थेचे संजय नहार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी कार्यलयाचे संचालक संजय ढोले आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अफगाण माजी विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या विविध समस्यांवर बोलतांना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील वसतीगृहात ज्या विद्यार्थ्यांना  कुठल्याही कारणास्तव राहणे अवघड किंवा असुरक्षित वाटत असेल अशा अफगाण विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सेंटरच्या वसतिगृहात सोय करण्यात येईल.

तसेच ज्या विद्यार्थांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या पालकांकडून पैसे येत होते, पंरतु, अफगाणमध्ये सध्या उपस्थित झालेल्या परिस्थिमुळे त्यांना पैसे येणे बंद झाले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंडियन काॅन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स तर्फे सहानभुतीपूर्वक विचार करण्यात येऊन त्यांना शुल्कात माफी किंवा कपात देण्यासंदर्भात गांभिर्याने विचार केला जाईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना रोजगाराची नितांत गरज आहे अशा विद्यार्थ्यांना देखील सर्वोतोपरी मदत केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना मिळालेली शिष्यवृत्तीचा कालावधी वाढविण्याबाबत ही पुर्नविचार करता येईल.

इंडियन काॅन्सिल फॉर कल्चरल रिलशन्सचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरध्वनीवरुन विद्यार्थ्यांना आश्वस्त करीत सांगितले की भारत सरकार पूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असून विद्यार्थींनी स्वतःला एकटे समजू नये. जे विद्यार्थी सुट्टी निमित्त अफगाण गेले होते आणि ते तिकडे अडकून पडले आहेत, त्यांना भारतात येण्याच्या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधत त्यांची व्हिसा प्रक्रिया कशी सुलभ होईल या दृष्टीने देखील पत्रव्यवहार करुन ह्यातून लवकर मार्ग काढला जाईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.