Pune News : खासगी रुग्णालयांच्या बिलांची काटेकोर तपासणी ; दोषींवर कारवाई करणार- रूबल अग्रवाल

एमपीसी न्यूज : कोरोना महामारीच्या काळात शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये नागरिकांना वाढीव बिले देण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व संशयास्पद बिलांची काटेकोर तपासणी करून शासन निर्णयानुसार दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिला.

कोरोना संकटकाळात शहर, उपनगरामध्ये नागरिकांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी महापालिकेकडून जम्बो कोविड केयर सेंटरसह 31 कोविड केयर सेंटर उभारण्यात आले होते.

त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे 88 खासगी रुग्णालयांमध्ये राखीव बेड ठेवण्यात आले होते. त्यामध्ये उपचार घेणाऱ्या पुणेकरांना आकारलेल्या बिलांची रक्कम महापालिकेकडून अदा करण्यात येणार होती.

परंतु, नागरिकांना अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत.

या संदर्भात बोलताना अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या, आजपर्यंत नागरिकांची सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांची बिले कमी करून दिली आहेत. त्या बिलांची प्री ऑडीट टीमकडून काटेकोर छाननी केली जात आहे. ज्या 35 रुग्णालयांविरोधात तक्रारी आल्या आहेत, त्या ठिकाणी आमच्या टीमकडून शासन निर्णयानुसार छाननी केली जात आहे. यामध्ये दोषींविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दंड वसुलीसाठी नव्हे स्वयंशिस्त लावण्यासाठी कारवाई

महाालिकेकडून मास्क न वापरणाऱ्या पुणेकरांकडून तब्बल 6 कोटी रुपयांहून जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. परंतु, लोकांना मास्क वापरण्याची स्वयंशिस्त लागावी हा या कारवाई करण्यामागचा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.