Pune News: कृषीपंप वीजबिल थकबाकीमुक्तीसाठी 4 हजार कोटी रुपयांच्या माफीची संधी

 एमपीसी न्यूज – कृषिपंपाच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील 12 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील 2644 कोटी 77 लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल 4 हजार 3 कोटी रुपयांची माफी मिळणार आहे.

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग नाही व चालू वीजबिलांचा देखील भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या कृषिपंप वीजजोडणी धोरणातून कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे 66 टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यातील 12 लाख 50 हजार 685 शेतकऱ्यांकडे 10 हजार 841 कोटी रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील 2644 कोटी 77 लाख रुपये महावितरणकडून निर्लेखनद्वारे सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूटद्वारे माफ करण्यात आले आहे. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे 189 कोटी 68 लाख रुपये समायोजित करण्यात आले आहे. आता या शेतकऱ्यांकडे 8007 कोटींची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च 2022 पर्यंत त्यातील 50 टक्के म्हणजे 4 हजार 3 कोटी 50 लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित 4 हजार  3 कोटी 50 लाख रुपये देखील माफ करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत बारामती परिमंडलातील 7 लाख 38 हजार 277 शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील निर्लेखन, व्याज व दंड माफी व समायोजनेद्वारे 2319  कोटी 40 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. तर सुधारित थकबाकीमधील 5832 कोटी 72 लाखांपैकी 50 टक्के रकमेचा येत्या मार्च 2022 पर्यंत भरणा केल्यास थकबाकीचे उर्वरित 50  टक्के म्हणजे 2916  कोटी 36 लाख रुपये माफ होणार आहेत. पुणे परिमंडलामधील 1 लाख 25 हजार 799  शेतकऱ्यांचे 180 कोटी 73  लाख रुपये माफ करण्यात आले असून 743 कोटी 75 लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित 371 कोटी 87 लाख रुपये माफ होणार आहेत. कोल्हापूर परिमंडलामधील ३ लाख 86 हजार 609 शेतकऱ्यांचे 334 कोटी 33 लाख रुपये माफ करण्यात आले असून 1488 कोटी 19 लाखांच्या सुधारित थकबाकीपैकी 50 टक्के रक्कम व चालू वीजबिल भरल्यास उर्वरित 744 कोटी 9 लाख रुपये माफ होणार आहेत.

आतापर्यंत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 5 लाख 52 हजार 276  शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी 359 कोटी 27 लाखांचे चालू वीजबिल व 409 कोटी 95 लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि 50 टक्के थकबाकी माफीचे एकूण 1452 कोटी 70 लाख रुपये माफ करण्यात आले आहे. या योजनेमध्ये बारामती परिमंडलातील 3 लाख 76 हजार 904, कोल्हापूर परिमंडलातील 1  लाख 42 हजार 689 आणि पुणे परिमंडलातील 32 हजार 683  शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

वीजग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणा देखील नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कटू कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे

या योजनेचा लाभ घेत पश्चिम महाराष्ट्रातील 1 लाख 80 हजार 522 शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे 561 कोटी 99 लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी 95 कोटी 12 लाख रुपये चालू वीजबिल व 50 टक्के थकबाकीचे 281 कोटींचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित 50 टक्के थकबाकीचे 281 कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. या योजनेतून बारामती परिमंडलातील 83 हजार 576, कोल्हापूर परिमंडल- 83 हजार 192 आणि पुणे परिमंडलातील 13 हजार 754 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.