Pimpri News: अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप! विकास ढाकणेंकडे ‘क्रीम विभाग’, वाघांची बोळवण, जगतापांची उपेक्षा

एमपीसी न्यूज -पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले आहे. भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांच्यावर आयुक्तांचा विश्वास असून ढाकणे यांना ‘क्रीम विभाग’ दिले. तर, नव्याने आलेले महसूल सेवेतील जितेंद्र वाघ यांची तुलनेने कमी महत्वाच्या विभागांवर बोळवण केली. तर, स्थानिक अधिका-यांमधून अतिरिक्त आयुक्त असलेले उल्हास जगताप यांची उपेक्षा केल्याचे विभाग वाटपावरुन दिसून येते.

महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाल्यामुळे तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (एक), शुक्रवारी रुजू झालेले दुसरे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि स्थानिक असलेले तिसरे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या कामकाजाचे आयुक्त पाटील यांनी वाटप केले आहे. आयुक्त पाटील यांनी त्यांच्याकडे अमृत, स्मार्ट सिटी, जेएनएनयूआरएमचे विशेष प्रकल्प आणि महत्वाचा लेखा विभाग ठेवला आहे.

अतिरिक्त आयुक्त (एक) विकास ढाकणे यांच्याकडे ‘हे’ आहेत विभाग!

प्रशासन, स्थापत्य मुख्यालय, स्थापत्य (उद्यान), स्थापत्य (प्रकल्प), स्थापत्य (क्रीडा), शिक्षण विभाग (प्राथमिक), माध्यमिक शिक्षण विभाग, अग्निशमन विभाग, उद्यान व वृक्षसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग (स्वच्छ भारत, महाराष्ट्र अभियानसह), क्रीडा, बांधकाम परवानगी, माहिती व तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन विभाग,वैद्यकीय विभाग, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि पशुवैद्यकीय अशा 17 विभागाचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सर्व क्रीम विभाग आयुक्त पाटील यांनी ढाकणे यांना दिले आहेत.

अतिरिक्त आयुक्त (दोन) जितेंद्र वाघ यांच्याकडील विभाग!

नगररचना, मध्यवर्ती भांडार, विद्युत मुख्य कार्यालय ( अणूविद्युत व दुरसंचारसह), नागरवस्ती विकास योजना विभाग, बीएसयुपी, ईडब्ल्यू प्रकल्प, बीआरटीएस प्रकल्प, निवडणूक, जनगणना (आधारसह), कर आकारणी व करसंकलन विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग, स्थानिक संस्था कर (एलबीटी), अतिक्रमण मुख्य कार्यालय (अनधिकृत बांधकम, अतिक्रमण नियंत्रण व निर्मुलन विभाग), भूमि आणि जिंदगी (विशेष नियोजन प्राधिकरण), कायदा, पाणीपुरवठा व जलनि:सारण आणि पाणीपुरवठा सेक्टर 23, पर्यावरण अभियांत्रिकी, सुरक्षा अशा 16 विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्त (तीन) उल्हास जगताप यांच्याकडील विभाग!

सर्व क्षेत्रीय कार्यालये व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणारे सर्व विभाग (सार्वजनिक वाचनालय, प्रेक्षागृहासह), झोनिपू, झोनिपू (स्थापत्य), नागरी सुविधा केंद्र, सभाशाखा, आयटीआय मोरवाडी व कासारवाडी, कार्यशाळा विभाग, अभिलेख कक्ष, कामगार कल्याण विभाग आणि माहिती व जनसंपर्क अशा 10 विभागाची जबाबदारी दिली आहे.

अतिरिक्त आयुक्तांनी या विभागांसाठी आयुक्तांच्या सर्व अधिकारांचा वापर करावा. विभागाची कर्तव्ये व कार्ये पार पाडावी. तथापि, त्यांच्या अखत्यारीतील विभागाअंतर्गतचे धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधीचे महापालिका, स्थायी समिती सभा यांना सादर करावयाचे सर्व प्रस्ताव आयुक्तांची मान्यता घेऊनच सादर करण्यात येतील. तसेच प्रपत्र अ मध्ये नमुद विभागांचे नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त असतील. या अधिकारामध्ये बदल करणे अथवा निरस्त करण्याचे हक्क आयुक्त राजेश पाटील यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.