SNBP Hockey Tournament : सेल हॉकी अकॅडमी, ओडिशाने पटकावले विजेतेपद

एमपीसी न्यूज – ओडिशाच्या सेल हॉकी अकॅडमी संघाने पाचव्या एसनबीपी अखिल भारतीय हॉकी 16 वर्षांखालील गटाच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी हर हॉकी अकॅडमी, सोनीपत संघाचा 2-0 असा पराभव केला.

सामन्याच्या पूर्वार्धात 19व्या मिनिटाला रितिक कुजुर यांच्या प्रेक्षणीय फिनिशमुळे हा गोल विलक्षण ठरला. त्याच्या ताकदवान फटक्याने हर अकॅडमीच्या गोलरक्षक अंकितला चकवले. अर्थात, या एकमेव गोलच्या आधारावरच सेलने विश्रांतीला आघाडी राखली होती.

उत्तरार्धात सामन्याच्या 54व्या मिनिटाला मुकेश टेटे याने मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. या गोलमुळे मिळवलेली दोन गोलची आघाडी कायम राखली. या दरम्यान त्यांची आक्रमकता कायम होती. त्यांच्या करण लाक्राला दोन वेळा गोल करण्याची संधी साधता आली नाही.

त्यापूर्वी, तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात यजमान एसनबीपी संघाने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत रिजनल डेव्हलमेंट सेंटर, झारखंड संघाचा 6-1 असा पराभव केला. त्यांच्या विजयात फहाद खानचा खेळ निर्णायक ठरला. त्याने चौथ्या मिनिटाला संघाचे खाते उघडले त्यानंतर आणखी दोन गोल केले.

एसएनबीपी संघाने मध्यंतराला केवळ एका गोलची आघाडी राखली असली, तरी दिशा बदलल्यानंतर उत्तरार्धात त्यांचा खेळ अधिक आक्रमक झाला. झैद मोहंमदने ३२व्या मिनिटाला गोल करून आघाडी 2-0 अशी केली. त्यानंतर अरुण पाल 36व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी वाढवली.

पुढे चारच मिनिटांनी अविनाश सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर एसएनबीपीचा चौथा गोल केला. फहादने नंतर 41 आणि 47 अशा सहा मिनिटांत दोन गोल करून ही आघाडी अधिक भक्कम केली. पराभूत संघाचा एकमात्र गोल फिलिप गुरिया याने 50व्या मिनिटाला केला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. धनराज पिल्ले यांच्या हस्ते पार पडले. या वेळी एसएनबीपी समूहाच्या अध्यक्षा डॉ. वैशाली भोसले, एसएनबीपीच्या संचालिका अॅडव्होकेट रुतुजा भोसले, स्पर्धा संचालक फिरोज शेख आणि संयोजन सचिव विभाकर टेलोरे उपस्थित होते.

निकाल – 

  • तिसरा क्रमांक – एसएनबीपी अकॅडमी , पुणे 6 (फहाद खान 4थे, 41वे आणि 47वे, झैद मोहमंद खान 32वे, अरुण पाल 36वे, अवनिश सिंग 40वे मिनिट) वि.वि. रिजनल डेव्हलपमेंट सेंटर, झारखंड 1 (फिलिप गुरिया 50वे मिनिट) मध्यंतर 1-0
  • अंतिम सामना – सेल हॉकी अकॅडमी,ओडिशा 2 (रितिक कुंजीर 14वे, मुकेश टेटे 54वे मिनिट) वि.वि. हर अकॅडमी, सोनीपत 0 मध्यंतर 1-0

वैयक्तिक पारितोषिक –

  • सर्वोत्कृष्ट गोलरक्षक – राहुल पाल (एसएनबीपी अकॅडमी, पुणे)
  • सर्वोत्कृष्ट बचावपटू – रोहन सिंग (एसएनबीपी, पुणे)
  • सर्वोत्कृष्ट मध्यरक्षक – मुकेश टेटे (सेल हॉकी अकॅडमी)
  • सर्वोत्कृष्ट आक्रमक – साहिल राहुल (हर अकादमी अकॅडमी)
  • स्पर्धेचा मानकरी – एक्का अनमोल ज्युनि. (सेल हॉकी अकॅडमी)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.