Pune News : वीज बिलांची सक्तीची वसुली ताबडतोब थांबवा – आमदार सिद्धार्थ शिरोळे

एमपीसी न्यूज – कोविडची साथ, टाळेबंदी अशा कारणांनी राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले असतानाच महावितरणने चालविलेली सक्तीची वीज बिल वसुली ताबडतोब थांबवावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

अनेक संघटनांनी उद्योग व्यवसाय आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याचे अहवाल दिले आहेत. राज्य सरकारला कदाचित याची जाणीव असावी. तरीही, राज्याचे ऊर्जा खाते आणि महावितरण वीज बिलांची वसुली सक्तीने करत आहे हे संतापजनक आहे. कोरोना साथीपूर्वी हे सर्व व्यावसायिक नियमितपणे वीज बिल भरत होते. सध्या ते अडचणीत आले आहेत अशा वेळेस सक्तीची वीज बिल वसुली करण्यात काय अर्थ आहे? थकीत वीज बिल आणि त्यावरील व्याज कसे भरावे अशी समस्या त्यांच्यापुढे आहे असे आमदार शिरोळे यांनी ऊर्जा मंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

सक्तीने वीज बिल वसुली करण्यापेक्षा त्यांना सुटसुटीत हप्ते बांधून द्यावेत, जेणेकरून बिल भरणे सोपे होईल, अशा सूचना प्रशासनाला द्याव्यात असे आमदार शिरोळे यांनी ऊर्जा मंत्र्यांना पत्राद्वारे सुचविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.