Wakad Crime News : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सरकारी रेशन दुकानातील माल चढ्या दराने काळ्या बाजारात विकणाऱ्या तिघांना सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली आहे. त्यांच्यासह दोन रेशन दुकानदारांवर जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदन द्वारका गुप्ता (वय 38), रितीक चंदन गुप्ता (वय 18, दोन्ही रा. रहाटणी, काळेवाडी, वाकड, पुणे), शंकर आयोध्या गुप्ता (वय 22, रा. साईनगर, कॉलनी क्रमांक चार, नखाते वस्ती, रहाटणी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर रेशन दुकानदार थोरात (पुर्ण नाव माहित नाही, वय 40, रा आनंदनगर झोपडपट्टी चिंचवड, पुणे), जांभळे (पूर्ण नाव माहित नाही, वय 30, रा. आनंदनगर, झोपडपट्टी, चिंचवड, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 27) सामाजिक सुरक्षा विभागाच्या विभागाच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती मिळाली की, काळेवाडी येथून सरकारी रेशन दुकानातील माल काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केला जात आहे.

त्यानुसार पोलिसांनी पवारनगर गार्डनच्या बाजूला काळेवाडी येथे सापळा लावून छापा टाकला. त्यात दोन दुचाकी (एमएच 14 / ई एल 6538 आणि एमएच 14 / जी एल 1547) वाहने पोलिसांनी जप्त केली. तसेच तिघांना ताब्यात घेतले.

तिघांकडून 37 हजार 400 रुपये किमतीचे 34 गव्हाचे पोते, 67 हजारांच्या दोन दुचाकी, असा एकूण एक लाख चार हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेशन दुकानदार थोरात आणि जांभळे यांनी अटक केलेल्या तीन आरोपींना रेशन दुकानात वितरित होणारा गहू पुरवला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुळे, अनिल महाजन, संगिता जाधव, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, राजेश कोकाटे सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.