Pune News : काळवीट मृत्यू प्रकरणी दोषींवर कारवाई करा : मनसेचे मुख्य सभेत आंदोलन

एमपीसी न्यूज : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या तुटलेल्या सीमाभिंतीतून भटक्या कुत्र्यांनी आत प्रवेश करत काळवीटांच्या कळपावर हल्ला केला. त्यामध्ये 4 काळवीटांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे सीमाभिंत दुरूस्तीत हलगर्जीपणा करणाऱ्या दोषींविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी मुख्यसभेत आंदोलन करण्यात आले.

मनसे गटनेता नगरसेवक वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आणि विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक बाबुराव चांदेरे, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप आदींनी आंदोलन केले.

पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कात्रज प्राणीसंग्रहालयाच्या सीमाभिंतीच्या दुरूस्तीमध्ये निविदा काढूनही दिरंगाई केली. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप आंदोलक नगरसेवकांनी केला. गटनेता वसंत मोरे यांनी या संदर्भात स्थायी समिती बैठकीत देखील आंदोलन केले होते. आजही मुख्य सभेत या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी तिरडी, काळवीटाच्या प्रतिमा घेत प्रतिकात्मक आंदोलन केले.

याची दखल घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना कात्रज प्राणी संग्रहालयाच्या सीमाभिंती संदर्भात निविदा प्रक्रियेनंतर दुरुस्ती कामाला तातडीने सुरूवात करण्याचे निर्देश दिले. या गदारोळात मुख्य सभा तहकूब करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.