Pune News : जम्बो कोविड सेंटरमधील मृत्यूची अतिरिक्त आयुक्तांकडून गंभीर दखल

सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला.

एमपीसी न्यूज – सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या जम्बो कोविड केअर रूग्णालयात दोन रुग्णांचा रविवारी मृत्यू झाला. त्याची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी गंभीर दखल घेतली आहे.

रुग्णालय व्यवस्थापन अधिकाऱ्यांसह, महापालिकेच्या आरोग्य आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक घेण्यात आली.

जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रलंबित असलेल्या कामांची तातडीने पूर्तता करण्यात यावी. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचे रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

नागरिकांनीही डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कोरोनाच्या रुग्णांना परस्पर रुग्णालयात आणू नये, असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून पुणेकरांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या आजारामुळे पुण्यात दोन हजारांहून नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुण्यातील रूग्णालयांमध्ये बेड शिल्लक राहिले नाहीत. सद्यस्थितीला घरीच उपचार करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

पण, रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळे तसेच वेळेवर उपचार न झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणेकरांच्या सोयीसाठी सीईओपी महाविद्यालयाच्या मैदानावर 800 बेडचे जम्बो कोविड केअर रूग्णालय उभारण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनही करण्यात आले. पुणे शहर आणि ग्रामीण भागातील कोणत्याही रूग्णांना उपचार दिले जातील. कोरोना रुग्णांचे मृत्यू होणार नाहीत, असे सांगितले होते. त्याला आठवडा उलटला तर रुग्णालय सुरू होऊन चार दिवस होत नाहीत तोच दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरात कोरोनाचे 95 हजारांच्या वर रुग्ण गेले आहेत. 78 हजारांच्या वर रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन या आजारावर मात केली आहे. तर, 14 हजार 999 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.