Pune News : उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी यांना दिलेली वागणूक निंदनीय- मोहन जोशी

एमपीसीन्यूज : हाथरस येथील बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी शांततामय मार्गाने निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने दिलेली वागणूक संतापजनक असून निंदनीय आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली.

हाथरस मधील १९वर्षीय दलित मुलीवर झालेला बलात्कार, तिच्यावर झालेले अत्याचार, त्यानंतर रातोरात करण्यात आलेले अंत्यसंस्कार हे सर्व चीड आणणारे, माणुसकीला काळीमा फासणारे आहे.

या तरुणीच्या कुटुंबियांची विचारपूस करण्यासाठी खासदार राहुल गांधी कर्तव्यभावनेने निघाले तेव्हा कलम 144 ची सबब सांगून त्यांना अडवले. या कलमाचा भंग न करता ते एकटे पायी निघाले असताना पोलीसांनी त्यांना आडदांडपणे रोखले, धक्काबुक्की केली.

हा प्रकार संतापजनक, निंदनीय आहे. लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याला या पद्धतीने वागणूक देणे ही उत्तर प्रदेश सरकारसाठी शरमेची बाब आहे. या प्रकाराने काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता संतप्त असून, संवेदनशील नागरिकही अस्वस्थता व्यक्त करीत आहेत.

योगी आदित्यनाथ सरकारला सत्तेवर क्षणभरही रहाण्याचा नैतिक अधिकार आता उरलेला नाही. हाथरसमधील घटनेच्या पाठोपाठ बलरामपूरमध्येही सामूहिक बलात्कार आणि मृत्यूची घटना घडते. यातून उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले दिसतात, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अशी मोहीम हाती घेतली. मग, हाथरस आणि बलरामपूर येथील घटनांबाबत ते मौन बाळगून का आहेत? आणि कोणत्या प्रवृत्तींना पाठिशी घालत आहेत? असा सवाल मोहन जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.