Pune News : ‘वसंतोत्सव’ 19 ते 21 फेब्रुवारीला ; तीन दिवस वैविध्यपूर्ण संगीताची मेजवानी

एमपीसी न्यूज – पुण्याच्या सांस्कृतिक पटलावरील मानबिंदू समजला जाणारा ‘वसंतोत्सव’ यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार आहे. यंदा हा महोत्सव 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 4 ते 10 या वेळेत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सवा’चे हे सलग 14 वे वर्ष आहे.

‘वसंतोत्सव’ यंदा डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून आयोजित करण्यात येणार असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना रसिकांना यंदा वैविध्यपूर्ण संगीताची मेजवानी मिळणार आहे, अशी माहिती डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद थोटे, आयोजन समिती सदस्य राजस उपाध्ये उपस्थित होते. महोत्सवात धृपद गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य, दक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीताचा मेळ अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेता येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.

महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी (दि.19, फेब्रुवारी) पं. जसराज यांच्या शिष्या व मेवाती घराण्याच्या प्रसिध्द गायिका अंकिता जोशी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर ज्येष्ठ धृपद गायक पं. उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे.

पहिल्या दिवसाचा समारोपात सुजात हुसेन खान (सतार), मुकेश जाधव (तबला), रणजीत बारोट (तालवाद्य) व सहकलाकार यांचा कलाविष्कार सादर होणार आहे.

दुसऱ्या दिवशी (दि.20, फेब्रुवारी) प्रसिध्द सतार वादक शाकीर खान यांचे वादन होईल. त्यानंतर शास्त्रीय गायक विजय कोपरकर यांचे गायन होईल. हिंदुस्तानी व दक्षिणात्य शास्त्रीय संगीताचा मेळ साधत प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया व वेणू बासरीचे मास्टर शशांक सुब्रमण्यम यांचे एकत्रित बासरी वादन होणार आहे.

यावेळी पं. विजय घाटे हे तबल्याची साथ करतील. या दिवसाचा समारोप प्रसिध्द शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या गायनाने होणार आहे.

तिसऱ्या दिवशी (दि.21, फेब्रुवारी) ज्येष्ठ तबला वादक पं. योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव व पं. नयन घोष यांचे पुत्र व शिष्य ईशान घोष यांच्या एकत्रित तबला वादनाने सुरुवात होईल. त्यानंतर पंकज उदास
यांचा गझल गायनाचा कार्यक्रम होईल.

महोत्सवाचा समारोप प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने होणार असून यावेळी त्यांच्या साथीला सारंगी वादक मुराद अली असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.