Pune News : पुणे जिल्ह्यात वाढले मतदार; 79 लाख 51 हजार 420 मतदारसंख्येची भर

एमपीसी न्यूज : भारत निवडणूक आयोगाच्या (Pune News) सूचनेनुसार राबवण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांची अंतिम मतदार यादी गुरुवारी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 79 लाख 51 हजार 420 मतदार इतकी एकूण मतदारसंख्या असून यादीत 74 हजार 470 मतदारसंख्येची भर पडली आहे.

भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 9 नोव्हेंबर 2022 पासून राबवण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील वेळापत्रकानुसार (Pune News) अंतिम मतदार यादी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी 5 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

PCMC : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मारुती भापकर यांची आयुक्तांकडे मागणी

या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 74 हजार 470 इतक्या मतदारांची वाढ झालेली असून त्यात पुरुष मतदार संख्या 35  हजार 598 इतकी, महिला मतदार संख्या 38 हजार 721 इतकी व तृतीयपंथी मतदार संख्या 151 ने वाढलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये 21 विधानसभा मतदार संघात एकूण 79 लाख 51 हजार 420 इतके मतदार समाविष्ट आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 41 लाख 66 हजार 265, महिला मतदारांची संख्या 37 लाख 84 हजार 660 व तृतीय पंथी मतदारांची संख्या 495 इतकी आहे.

अंतिम मतदार यादी पाहणीसाठी सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात (Pune News)  उपलब्ध करुन दिलेली असल्याने नागरिकांना आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. तसेच  व https://www.nvsp.in व https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने छायाचित्र नसलेली मतदार यादी उपलब्ध असून मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपले नाव अंतिम मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याबाबतची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

मतदार यादीत अद्यापही नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी https://www.nvsp.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावे किंवा नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म नं.6 भरून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा, असेही डॉ. देशमुख यांनी कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.