Pune News : विजयस्तंभाला नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे : पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख

पास शिवाय कुणालाही विजयस्तंभ परिसरात प्रवेश नाही

एमपीसी न्यूज : कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला मानवंदनेसाठी 1 जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण 1 जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाजमाध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे विजयस्तंभाला नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे.

दरम्यान,   जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भीमा कोरेगावसह अकरा गावामध्ये 30 डिसेंबर ते 2 जानेवारी पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

तसेच भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आल्याचा आदेश जारी केला.

त्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिक्षक देशमुख म्हणाले, कोरेगाव भीमा येथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही निवडक लोकांनाच जिल्हा पोलिस ठाण्यांमधून पासेस दिले जाणार आहेत.

पास शिवाय कुणालाही विजयस्तंभ परिसरात प्रवेश नाही. त्यामुळे नागरिकांनी दूरदर्शन सह्याद्री तसेच समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण होणार असल्यामुळे घरातूनच अभिवादन करावे. विजयस्तंभाकडे कोणीही येऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.