Pune  News: रक्तपेढी संचलनासाठी संस्थेची निवड

एमपीसी  न्यूज: पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या  रक्तपेढीच्या संचलनासाठी पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशन या संस्थेबरोबर करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बावीसशे चौरस फूट जागेवर रक्तपेढीची निर्मिती करण्यात येत आहे. पुणे महापालिका आणि पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहा वर्षांच्या मुदतीसाठी हा प्रकल्प चालविण्यात येणार आहे. या संस्थेकडून जागेचे भाडे घेण्यात येणार नाही.

पाणी आणि वीजपुरवठ्याचा खर्च महापालिका करणार आहे. रक्तपेढी २४ तास सुरू ठेवणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहणार आहे.

रासने पुढे म्हणाले, जगात प्रत्येक दिवशी विविध प्रकारच्या उपचारांसाठी ४० हजार युनिट रक्ताची गरज लागते. कृत्रिम पद्धतीने रक्ताची निर्मिती करता येत नसल्याने रक्त संकलन आणि रक्तसाठा करण्यासाठी रक्तपेढ्या महत्त्वाच्या ठरतात. आतापर्यंत महापालिकेची रक्तपेढी नसल्याने इतर रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत होते. महापालिकेच्या पहिल्या स्वतंत्र रक्तपेढीच्या निर्मितीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अत्यल्प दरात मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

*पूना मेडिकल रीलिफ अण्ड रीसर्च फाउंडेशनने दिलेले रक्ताच्या विविध चाचण्यांचे दर*
संपूर्ण रक्त तपासणी – ७०० रुपये
रेड सेल कॉन्सनट्रेशन – १०५० रुपये
प्लाझ्मा – ३०० रुपये
प्लेटलेट कॉन्सनट्रेशन – ३०० रुपये
अफीअरसिस फॉर एसडीपी – ९४५० रुपये
फॅक्टर VIII फॅक्टर IX आणि क्रायोप्रीपिटेट – प्रत्येकी १०० रुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.