Pune : वाईट काम करणारा आपला असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे- नितीन गडकरी

एमपीसी न्यूज -चांगले काम करणाऱ्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे मग तो कुठल्याही पक्षाचा असो आणि वाईट काम करणारा आपला जरी असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे ठाम मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. काँग्रेस सत्तेत असताना भाजपच्या संस्थावर कारवाई केली जाते. भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेसच्या संस्थांवर कारवाई केली जाते. हे थांबले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या नागरी बँकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते आदी उपस्थित होते.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, यशाचे बाप अनेक असतात मात्र अपयश अनाथ असते. आमच्या पक्षातील विधानसभा लोकसभा निवडणुका हरलेल्या उमेदवाराला जेव्हा विचारतो ‘का हरलास?’ तेव्हा तो म्हणतो की फ्लेक्स लावण्यास पक्षाने पैसे दिले नाही. परंतु यशाप्रमाणे अपयशाची जबाबदारी घ्यायला सुद्धा नेतृत्वाने शिकले पाहिजे.

गडकरी पुढे म्हणाले, “सहकार चळवळ ही एकमेकांच्या सहकार्याने उभी राहिलेली चळवळ आहे. व्यक्तिगत संबंध, सर्वसमावेशकता, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती हे चळवळीचे मूळ आहे. सहकाराचा सिद्धांत आणि गणिताचा सिद्धांत हा एकच आहे. त्यामुळे नागरी बँकांमध्ये एकत्रित काम करण्याची पद्धती गरजेची आहे. तंत्रज्ञान, व्यवस्थापन, स्त्रोत या गोष्टी जरी नागरी बँकांकडे असतील, तरीही विश्वसनीयता असणे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे विश्वसनीयता हे 21 व्या शतकात बँकांसाठीचे मोठे भांडवल आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.