P‌une : ‘प्रभातस्वर’ मैफलीत पंडित अतुलकुमार यांचे सूरमयी व्हायोलिन वादन

एमपीसी न्यूज : स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत आणि (Pune) प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर आयोजित प्रभातस्वर मैफलीत पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे गायकी आणि तंतकारीचा सुरेल मिलाफ साधणारे व्हायोलिन वादन रसिकांसाठी पर्वणी ठरले.

ही मैफल काल (दि. 28) सकाळी डेक्कन जिमखाना येथील गोखले इस्टिट्यूटच्या आवारात असलेल्या ज्ञानवृक्षाखाली आयोजित करण्यात आली होती. पंडित श्रीधर पार्सेकर यांच्याकडून आत्मसात केलेली हिंदुस्थानी वादनशैली आणि डॉ. येहुदी मेन्युहीन यांच्या पाश्चात्य वादनशैलीचा मनोहारी संगम पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या वादनातून अनुभवायला मिळाला.

Pune : माजी सैनिक संघटनेचे अधिवेशन उत्साहात संपन्न

पंडित उपाध्ये यांनी वादनाची सुरुवात ललत रागाने केली. त्यांच्या वादनातून सुरांच्या आखीव-रेखीव मांडणीची दिव्यानुभूती तर मिळालीच त्याच बरोबरीने रसिकांच्या मनात ललतचे स्वर गुंजारव घालत राहिले. दिग्गज कलाकारांनी सिद्ध करून ठेवलेले राग वाजवताना त्या त्या कलाकाराची प्रकर्षाने आठवण येते; असे आवर्जून नमूद करून पंडित उपाध्ये यांनी जोगिया रागातील ठुमरी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. ‌‘वद जाऊ कुणाला शरण गं’ हे नाट्यगीत ऐकताना पंडित उपाध्ये यांनी मैफलीदरम्यान उल्लेख केल्याप्रमाणे ते वाद्यावर वाजवत नाहीत तर वाद्यावर गायचा प्रयत्न करतात याची प्रचिती रसिकांना आली.

यानंतर पंडित उपाध्ये यांनी बसंत मुखारी रागातील आलाप-जोड-झाला सादर करून गायकी आणि तंतकारी अंगाच्या वादनातील फरक दर्शविला.

‌‘तीर्थ विठ्ठल-क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाद्वारे पंडित उपाध्ये यांनी प्रेक्षकांना व्हायोलिन नुसते वाजत नाही तर खरेच गाते असा आनंद दिला. पंडित उपाध्ये यांनी कार्यक्रमाची सांगता सोहनी भटियार रागातील बंदिश आणि नंतर भैरवी सादर करून केली. पंडित उपाध्ये यांना पंडित मुकेश जाधव यांनी तबल्यावर समर्पक साथ केली. सविता सुपनेकर आणि माधवी गोखले या त्यांच्या शिष्यांनी व्हायोलिन साथ दिली.

पंडित उपाध्ये यांच्याशी मंजिरी धामणकर यांनी संवाद साधला.प्रभातस्वर सारखी मैफल आम्हा कलाकारांनाही सहसा अनुभवयाला मिळत नाही, असे सांगून पंडित उपाध्ये म्हणाले, सकाळच्या निसर्गरम्य वातावरणात ललत राग बऱ्याच दिवसांनी वाजवायला मिळाला. अशा काही निमित्तांनी हे राग जिवंत राहात आहेत. तसेच मध्यरात्रीचे दरबार-मालकंस असे रागही आता कालातीत होऊ लागले आहेत. कारण रात्रीच्या सांगीतिक मैफलीच आता अभावाने होतात; पण असे कार्यक्रम पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे.

कलाकारांचा सन्मान मकरंद केळकर, संजीव साठे, शशांक चांदोरकर, गौतम असणीकर यांनी केला. ‌‘प्रभातस्वर’ मैफलीची संकल्पना अपर्णा केळकर यांनी विशद (Pune) केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.