Pune : पॅनारोमा नृत्य महोत्सवाचे 13 व 14 जानेवारी रोजी आयोजन

एमपीसी न्यूज – पुण्यातील आर्टिटयूड संस्थेच्या (Pune) वतीने ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु स्मिता महाजन यांच्या शताब्दीपूर्ती निमित्त येत्या 13 व 14 जानेवारी रोजी पॅनारोमा नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात गुरु स्मिता महाजन यांच्या 30 वर्षांच्या नृत्य क्षेत्रातील कारकिर्दीचे अवलोकन करण्यात येणार असून महाजन यांच्या निवडक नृत्य नाटक निर्मितीचे सादरीकरण देखील यावेळी होणार आहे. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन या ठिकाणी दोन्ही दिवशी सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5.30ते 8 अशा चार सत्रांमध्ये महोत्सव संपन्न होईल आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर तो सर्वांसाठी विनामूल्य खुला असेल.

तीन दशकांहून अधिक काळ भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक मराठी कलाकारांमध्ये स्मिता महाजन यांचे नाव अग्रेसर आहे. गुरु डॉ. सुचेता भिडे चापेकर यांच्या शिष्या असलेल्या स्मिता महाजन एक उत्तम नृत्यांगना असून संरचनाकर, रचनाकार, संगीतकार आणि शिक्षकही आहेत. खास भरतनाट्यम् सादरीकरणासाठी त्यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या पन्नासहून अधिक रचना ‘मार्गम उन्मेष’ नावाने पुस्तक आणि सीडी स्वरूपात प्रकाशित झाल्या आहेत. भारतात आणि भारताबाहेर त्यांचे अनेक प्रयोग आणि सप्रयोग व्याख्याने झाली आहेत.

त्यांच्या षष्ट्याब्दीपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात आर्टिटयूड संस्था निर्मित ‘दासरेदरे पुरंदरदासा’ या सादरीकरणाने होईल. यामध्ये संत कवी पुरंदरदासांच्या रचनांद्वारे त्यांच्या जीवनाचे नृत्याद्वारे चित्रण रसिकांसमोर सादर होईल. या निर्मितीची संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन हे गुरु स्मिता महाजन यांचे आहे.

यानंतर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आघाडीवर असलेल्या स्त्रियांना मानवंदना देणाऱ्या ‘स्वातंत्र्य योधिनी’ याचे सादरीकरण होईल. सृजननादच्या वतीने याची निर्मिती करण्यात आली असून गुरु स्मिता महाजन यांनी याची गीते लिहिली असून त्याला संगीतही दिले आहे. सायंकाळच्या सत्राची सुरुवात कवी कालिदास लिखित मेघदूत या महाकाव्याच्या मराठी समाश्लोकी सादरीकरणाने होईल. याची निर्मिती आर्टिटयूड संस्थेची असून सादरीकरणाची संकल्पना, लेखन आणि नृत्यदिग्दर्शन स्मिता महाजन यांचे आहे. यानंतर कवी कालिदासाच्या प्रसिद्ध कथेवर आधारित ‘शाकुंतल’ चे सादरीकरण होईल. अलका लाजमी यांनी याची निर्मिती केली असून याने पहिल्या दिवसाची सांगता होईल.

Pune :128 व्या जयंती दिनी संग्रहालय महर्षी दिनकर केळकर यांना अभिवादन

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात ‘मार्गम उन्मेष’ याने होईल भरतनाट्यममधील मार्गम पद्धतीने सादर होणाऱ्या नृत्याची अनुभूती यामध्ये उपस्थित रसिकांना घेता येणार आहे. याची संकल्पना, लेखन आणि नृत्यदिग्दर्शन हे पूर्णत: स्मिता महाजन यांचेच आहे. ही नवी निर्मिती असून याचे प्रथम सादरीकरण या महोत्सवात होणार आहे हे विशेष.

यानंतर गुरु स्मिता महाजन लिखित ‘मार्गम उन्मेष’ या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचे आणि ‘हस्त विनोयोगा’ या संशोधनपर संकलनाचे प्रकाशन होईल. महोत्सवाच्या चौथ्या आणि शेवटच्या सत्राची सुरुवात ‘देवी’ या नृत्यनिर्मितीने होईल. देवी पार्वतीच्या विविध पात्रांद्वारे स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचे चित्रण यामध्ये करण्यात आले आहे.याचे गीत लेखन आणि नृत्य दिग्दर्शन स्मिता ताईंचे आहे. भगवद्गीतेतील अर्जुन आणि कृष्ण यांच्यातील संवादाचे नृत्य सादरीकरण असलेल्या ‘नृत्य गीताई’ याच्या सादरीकरणाने महोत्सवाचा समारोप होईल. याची निर्मिती कला प्रांगण यांची असून गुरु स्मिता महाजन यांनी यासाठी संगीत दिले आहे. 25 हून अधिक नृत्यांगना वरील सर्व कलाप्रकार शास्त्रीय नृत्यकलेच्या प्रेमी प्रेक्षकांसाठी सादर करणार असून यामध्ये गुरु स्मिता महाजन यांच्या 13 विद्यार्थिनींसोबतच वाशी, ठाणे, नाशिक येथील नर्तिका सहभागी होतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.