Pune: कोरोना विरुद्ध लढ्यात पुणे महापालिकेचे काम प्रशंसनीय : ब्रिगेडियर कुलजीतसिंग

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढ्यात पुणे मनपाने सर्व स्तरांवर प्रशंसनीय काम केलेले आहे. त्यामुळे मनपाचे आम्ही कौतुक करीत आहोत. या लढ्यात भारतीय सैन्य दल आपल्यासोबत असल्याचे पुणे सब एरियाचे चीफ स्टेशन कमांडर ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी सांगितले. लवकरच या लढ्यात आपल्याला यश मिळेल. या लढ्यातील मनपाच्या कार्यकर्तृत्त्वाला भारतीय रक्षा मंत्रालयाच्या वतीने आम्ही सलामी देत आहोत, असेही ते म्हणाले. यावेळी ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना मानवंदना दिली. 

कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पुणे महापालिकेस भारतीय सैन्य दलाच्या वतीने सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. पुणे मनपा अधिकारी, कर्मचारी संघटना, डॉक्टर्स, आरोग्यसेवक, अशा विविध पातळीवर लढा देणाऱ्यांचा सन्मान व मानवंदना देण्याचा गौरव सोहळा मनपाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी प्रथमतः कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पित केली.

शेखर गायकवाड म्हणाले, 1890 ते 1913 या कालावधीत प्लेगच्या साथीने शहरात थैमान घातले होते. तात्कालीन परिस्थितीत काही प्रमाणात उपचार व सावधानता यावर आधारित लढा देण्यात आला होता. कोरोना विषाणू प्रादुर्भाव लढा हा वेगळा आहे. या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने कोरोना विरोधात लढणाऱ्यांचा केलेला सन्मान व दिलेली मानवंदना मनोबल उंचावण्यासारखी आहे. भारतीय सैन्य सीमेवर दिवस रात्र लढा देत आहेत. देशवासीयांचे संरक्षण करीत आहेत. या लढ्याबद्दल संरक्षण मंत्रालयाने व्यक्त केलेल्या भावनेबद्धल आम्हीही सलामी देत आहोत.

रुबल अगरवाल यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी केले. आभार अतिरिक्त आयुक्त शांतानु गोयल यांनी मानले.

यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्यप्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विजय दहिभाते, उपायुक्त राजेंद्र मुठे, अनिल मुळे, डॉ. अंजली साबणे, डॉ. मनीषा नाईक, शिवाजी दौडकर, शिवाजी लंके, अधिकारी, कर्मचारी तसेच मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.