Pune : महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये पाणी, कचरा, आरोग्य, ड्रेनेजची समस्या गंभीर; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांत शुद्ध पाणी, जागोजागी साठलेला कचरा, आरोग्य, ड्रेनेजची, रस्त्यांची समस्या गंभीर आहे. याकडे पुणे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

फुरसुंगी, उरुळी देवाची, लोहगाव, साडेसतरानळी, केशवनगर, धायरी, आंबेगाव, बावधन, शिवणे, उत्तमनगर, उंड्री ही 11 गावे न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. पण, या गावात विकासकामे काही होताना दिसून येत नाहीत. या 11 गावांमधून दोन नगरसेवक निवडून आले. त्यांनाही विकासकामे करण्यासाठी निधी देण्यात आला नाही. त्यामुळे गावकऱ्यांची ओरड सुरू आहे.

पुणे महापालिकेकडून कर मात्र सातत्याने वसूल केला जात आहे. शिवणे – उत्तमनगर गावांतील कचरा नदीच्या आवारातच टाकला जात असल्याचे चित्र दिसून येते. तर, या गावांमध्ये विकासकामे करण्यात महापालिका प्रशासन आणि भाजपच्या सत्ताधारी मंडळींना अपयश येत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केला. या गावांत 24 तास पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची परिसरात पुणे शहराचा कचरा जिरविला जातो. या गावांमध्येही पाहिजे त्या प्रमाणात विकासकामे होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.