Pune – राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन तर उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतारीच्या झंकाराने ‘स्वरमल्हार’ महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज – पावसाची संततधार, राग मल्हारची अनुभूती (Pune) आणि मन व्याकूळ करणारे सतारीचे झंकार अशा वातावरणात आठव्या तीन दिवसीय ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचा आज समारोप झाला. स्वारगेट जवळील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ओर्लीकॉन बाल्झर्स आणि व्हायोलिन अकादमी यांच्या वतीने सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी बढेकर गृप, विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लि., विलो यांचे विशेष सहकार्य महोत्सवाला लाभले होते.

व्हायोलिन अकादमीचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, ओर्लीकॉन बाल्झर्सचे प्रवीण शिरसे, बढेकर गृपचे प्रवीण बढेकर, जावडेकर डेव्हलपर्स विलास जावडेकर, लोकमान्य मल्टीपर्पजचे भालचंद्र कुंटे, मुकाईवाडीचे सुशीलकुमार देशमुख, व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये व महोत्सवाचे आयोजक राजस उपाध्ये यांची उपस्थिती महोत्सवाला लाभली.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाला पं वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या शास्रीय गायनाने सुरुवात झाली. त्यांनी राग मल्हारचे बहारदार सादरीकरण केले. मियां मल्हार मध्ये ‘बोले रे पपिहरा…’ ही रचना त्यांनी प्रस्तुत केली. यानंतर कुमार गंधर्व यांची ‘ऐसन कैसन बरसत बरखा…’ ही बंदिश त्यांना सादर केली. ‘बरसन लागी सावन बुंदिया… ‘ या ठुमरीने त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला.

पंडित कुमार गंधर्व यांनी ऋतु संगीत, बरखा ऋतु, गीत वर्षा असेल असे अनेक कार्यक्रम केले. यामध्ये त्यांनी फक्त आणि फक्त पावसातल्या बंदिशी, लोकगीते सादर केली, अशी आठवण राहुल देशपांडे यांनी सांगितली.

ते पुढे म्हणाले की, “अशा एखाद्या व्यासपीठावर गायला बसलो की गवई म्हणून (Pune) कलाकाराचा कस लागतो. इथे समोर असलेल्या उत्स्फूर्त रसिकांमुळे ऊर्जेची देवाणघेवाण होते. स्फूर्ती मिळते. पुणेकरांसारखी दाद दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी मिळत नाही.”

राहुल देशपांडे यांना ईशान घोष (तबला), तन्मय देवचके (संवादिनी), जिग्नेश वझे व ऋषिकेश पाटील (गायन व तानपुरा) यांनी साथसंगत केली.

Pimpri News – वृक्षारोपणाने साजरी केली गुरुपौर्णिमा

यानंतर जागतिक कीर्तीचे तबलासम्राट पद्मविभूषण किशन महाराज यांचे शिष्य व बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं कुमार बोस यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी यावेळी झपतालचे दमदार सादरीकरण केले. बनारस घराण्यातील तीनलातील अवचर त्यांनी लय, संगीत आणि गायकी अंगाने प्रस्तुत केला. यानंतर त्यांनी तिहाई, कायदा यांचे सादरीकरण केले. किशन महाराज यांच्या रचनेने त्यांनी आपल्या तबलावादनाचा समारोप केला. त्यांना तन्मय देवचके (संवादिनी), रुहेन बोस (तबला) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाची सांगता करताना इमादादखानी घराण्याच्या सातव्या पिढीचे सतारवादक उस्ताद शाहीद परवेज यांनी राग चारूकेशी प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी आलाप, जोड झाला चे दमदार सादरीकरण केले. झपाताल आणि तीन तालातील गत प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या वादनाचा आणि महोत्सवाचा समारोप केला. त्यांना पद्मश्री पं विजय घाटे यांनी समर्पक तबलासाथ केली. तर प्राची आपटे खान यांनी तानपुरा साथ केली.

मिलिंद कुलकर्णी यांनी संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.