BNR-HDR-TOP-Mobile

Pune : होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पीडित कुटुंबियांना रेल्वेकडून मदत निधी सुपूर्द

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पुणे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या होर्डिंग दुर्घटना प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये तर जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना एक लाख रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत. या मदत निधीचे धनादेश पीडितांच्या कुटुंबियांना देण्यात आले असून तीन जणांच्या कुटुंबीयांनी हे धनादेश कौटुंबिक कारणास्तव अद्याप स्वीकारले नाहीत.

पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मालधक्का चौकात अनधिकृत होर्डिंग रस्त्यावर पडल्यामुळे रस्त्यावर थांबलेल्या चार निष्पाप नागरिकांचा बळी गेला. तसेच काही जण जखमी झाले. या प्रकरणी दोषी असणा-यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महापालिका, पोलीस आणि रेल्वे प्रशासन तिन्ही बाजूंनी कामाला लागले. पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग लावल्याप्रकरणी कारवाई केली. रेल्वे प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई केली. पण निष्पाप बळी गेलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांचे पुढे काय? असा प्रश्न असल्याने रेल्वे प्रशासनाने पीडित नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे ठरविले.

होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर जखमी व्यक्तींना एक लाख रुपये आणि रुग्णालयाचा खर्च रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रकरणातील मृत्यू झालेले शाम राजाराम धोत्रे यांच्या मदतीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश काढण्यात आला आहे. परंतु त्यांच्या वारसदारांची माहिती मिळत नसल्याचे ही रक्कम त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत अद्याप पोहोचली नाही. वारसाची ओळख पटल्यास ही मदत रक्कम त्यांना देण्यात येणार आहे.

तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेले शामराव गंगाधर कासार यांच्या कुटुंबियांसाठी देखील पाच लाख रुपयांचा धनादेश काढण्यात आला. हा धनादेश घेऊन रेल्वेचे एक पथक त्यांच्या जळगाव मधील सावदा या मूळ गावी गेले. परंतु घरात दुःखद वातावरण असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी हा धनादेश घेण्यास नकार दिला. त्यांचा दशक्रिया विधी पूर्ण झाल्यानंतर हा धनादेश त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

जखमी उमेश मोरे यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या परिवाराला मदत म्हणून रेल्वेने एक लाख रुपये मदत देण्याचे ठरविले आहे. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी ही मदत राशी घेण्यास विरोध केला. परंतु रेल्वे प्रशासन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. जखमी रुग्णांवर उपचारासाठी होणारा खर्च देखील रेल्वे कडून देण्यात येणार आहे. आणखी एक जखमी महेश वसंतराव येशवेकर यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या देखील उपचाराचा खर्च रेल्वे करणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत निधी देण्यात येत आहे. या मदत निधीमुळे नागरिकांनी रेल्वे विरोधात केलेल्या कोणत्याही दाव्यांवर परिणाम होणार नाही. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.