Pune : महामाता रमाई महोत्सवात अशोक देवळेकर यांना रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज : सध्याची परिस्थिती पाहता (Pune) सर्व प्रवाहातील मानवतावादी सामर्थ्य एकत्र आणणे आवश्यक आहे. राजकारणात बेरजेला खूप महत्त्व आहे. राजकीय व्यक्ती सोयीसाठी-सत्तेसाठी बेरीज करतात आणि धर्मांधता वाढवतात, विषाची पेरणी करतात कारण त्यांना सत्ता प्रिय आहे.

सध्या भारताच्या नकाशावर सर्वत्र विद्वेषाचे वातावरण दिसते आहे; सर्वत्र विष पेरले जात आहे. त्यामुळे धर्माधर्मातील प्रेम-सहिष्णुता-एकोपा यांचे पूर्णपणे दिवाळे निघालेले दिसत आहे. बंधुतेचे तत्त्वज्ञान संविधानात कोरले गेलेले आहे; परंतु सध्या समाजात बंधुता दिसत नाही.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर महोत्सवाच्या निमित्ताने ईश्वरवादी-निरिश्वरवादी दोन्हीही प्रवाहातील व्यक्ती एकत्र आलेल्या दिसतात. हा भारतीय एकात्मकतेचा सुंदर प्रयोग आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवाला आज (दि. 1 फेब्रुवारी) सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रामजीबाबा आंबेडकर स्मृती पुरस्कार सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी अशोक देवळेकर यांना डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

रमाई-बाबासाहेब यांच्यावरील दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या हस्ते या प्रसंगी झाले. रमाई महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर, माजी मंत्री रमेश बागवे, स्वागताध्यक्षा लताताई राजगुरू, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.

Chinchwad Bye Election : भाजपकडून अश्विनी जगताप यांनी घेतला उमेदवारी अर्ज

डॉ. सबनीस पुढे म्हणाले, रमाई महोत्सव हा आता कोणा एका जातीचा किंवा धर्माचा राहिलेला नाही. निळ्या झेंड्यांच्या साक्षीने विविध धर्मांच्या-पंथांच्या अनुयायांचा मिलाफ आणि (Pune) एकोपा रमाईच्या पायाशी पाहायला मिळतो आहे. बाबासाहेबांचे समाजाप्रती कार्य खूप मोठे आहे.

संविधान पेरणार्‍या बाबासाहेबांना भारताने-संस्कृतीने माणूसपण नाकारले, ज्ञान नाकारले. आता धार्मिक संस्कृती ऐवजी संविधान संस्कृती जोपासाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारताच्या बहुभाषिक समाजाला बाबासाहेबांनी संविधानाची देणगी दिली आहे. या संविधानामुळेच हा देश आज एकत्रितपणे टिकून राहिलेला आहे.

डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून पाच लाख रुपयांची देणगी जाहीर

या वेळी बोलताना डॉ. नीलम गोर्‍हे यांनी महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. त्या म्हणाल्या, माणूस शिक्षित झाला की समाजापासून दूर गेल्याची उदाहरणे आहे, पण डॉ. आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाची उंची वाढविण्याचा कसोशिने प्रयत्न केला. रमाई-बाबासाहेब यांच्यावरील दुर्मिळ चित्रप्रदर्शन विधानभवनात लावण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासनही त्यांनी दिले.

सातत्याने लोकसहभागातून होत असलेल्या रमाई महोत्सवाचे अध्यक्षपद मिळणे ही भूषणावह बाब आहे, असे नमूद करून अ‍ॅड. प्रमोद आडकर म्हणाले, रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आयुष्याची वाटचाल करावी. रमाईंच्या त्यागातून आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले. रमेश बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेविका पल्लवी जावळे यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. आभार लताताई राजगुरू यांनी मानले.

महामाता रमाई महोत्सवाचे उद्घाटन (Pune) उद्या (दि. 2) सायंकाळी 6 वाजता महामाता रमामाई आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.