Pune : प्रसंगी वाईटपणा घ्या, पण आंबील ओढ्यातील सर्व अतिक्रमणे काढा : अश्विनी कदम

एमपीसी न्यूज – पावसाळा पंधरा-वीस दिवसांवर आला आहे. त्यामुळे प्रसंगी वाईटपणा घ्या, पण आंबील ओढ्यातील सर्व अतिक्रमणे काढा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी कदम यांनी महापालिका अयुक्तांकडे केली आहे.

प्राईममुव्ह संस्थेने सुचविल्याप्रमाणे नाल्याची रुंदी-खोली करा, नाल्यावरील पुलांची उंची वाढवा, अनावश्यक लोखंडी पूल काढून टाका. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी पर्वती परिसरातील आंबील ओढ्या लगत राहणाऱ्या नागरिकांना पुराच्या धोक्यापासून सुरक्षित करून करून दिलासा द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.

हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सातत्याने सभागृहात, लेखी मागण्याद्वारे, सारख्या बैठकीच्या माध्यमातून या मागण्या करीत असल्याचे कदम यांनी सांगितले. आंबील ओढ्यालगत राहणारे नागरिक पावसाळा उंबरठ्यावर आलेला पाहून भयभीत आहेत. नाल्यातील सीमा भिंतीची कामे असो, ड्रेनेज लाईन, चेंबर असो किंवा इतर कामे ही जागेवर झालेलीच नाहीत. नाल्याची पाहणी करून पावसाळ्यापूर्वीच या कामांना गती द्यावी, असेही त्या म्हणाल्या.

दि. 16 मार्च 2020 रोजी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात बैठक झाली होती. त्यामध्ये आंबील ओढ्याला दि. 25/ 9/ 2019 रोजी आलेल्या पुराच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. नगरसेविका अश्विनी कदम, मलनिस्सारण विभागातर्फे प्रविण गेडाम, हर्षदा शिंदे, प्राईममूव्हतर्फे विशाल उजागरे उपस्थित होते.

मात्र, या बैठकीत ठरविण्यात आलेल्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचे अश्विनी कदम म्हणाल्या. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेक नागरिकांचा बळी गेला होता. कित्येकांचे घरातील सामान वाहून गेले होते. तर, चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.