Pune News : एकविरा देवी गडावर रोप वे ; महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रकल्प उभारणार

एमपीसी न्यूज : एकविरा देवी गडावर जाण्यासाठी रोप-वे प्रस्तावित करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून (Pune News) हा प्रकल्प करण्यात येणार होता. मात्र, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून  (एमएसआरडीसी) हा प्रकल्प करण्यात येणार आहे. त्याला राज्य शासनाकडून मान्यताही मिळाली आहे.

एकवीरा देवीचे मंदिर डोंगरावर आहे. सह्याद्री पर्वताच्या कुशीतील कार्ला येथील डोंगरावर हे मंदिर आहे. त्यामुळे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या चढाव्या लागतात. देवीचे मंदिर डोंगरात असून परिसरात लेणी आहे. तिला कार्ला लेणी असे म्हटले जाते. मंदिराचा गाभारा खूप छोटा आहे. हा परिसर देवीच्या दर्शनासह पर्यटनासाठी आणि निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

पावसाळ्यामध्ये या परिसरातील सृष्टी सौंदर्य मनाला मोहवून टाकणारे असते. डोंगरावरून खळाळत कोसळणारे धबधबे पाहण्यासाठी आणि या ठिकाणापासून जवळच प्रसिद्ध लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे असल्याने या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात. भाजे लेणीसह लोहगडासह अन्य शिवकालीन ऐतिहासिक किल्ले आहेत. त्यामुळे देवदर्शनाबरोरच पर्यटनासाठीही अनेक जण या भागात येतात.

PCMC News : सँडविककडून महापालिकेला मशीनरी सेटअप

लोणावळ्याजवळील कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिरात (फ्युनिक्युलर ट्रॉली) किंवा रोप वे तयार करण्यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन पोर्ट रेल आणि रोप वे कॉर्पोरेशन लिमिटेड (आयपीआरसीएल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता.रोप वेच्या निर्मितीसाठी आर्थिक आणि तांत्रिक सोयींसाठी अहवाल तयार करणे, निविदा प्रक्रिया राबवणे यासाठी राज्य पर्यटन विभाग आणि आयपीआरसीएल यांच्यात हा करार करण्यात आला होता. हा प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ (बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल) या तत्त्वावर सुरू करण्यात येणार होता. मात्र, आता हा प्रकल्प रस्ते महामंडळाकडून करण्यात येणार आहे.

लोकप्रिय तीर्थक्षेत्र असल्याने आणि जवळ कार्ला लेणी पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी रोप वे प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. (Pune News) एकविरा देवी मंदिरात दरवर्षी सात ते आठ लाख भाविक येतात. रज्जू मार्गामुळे एकविरा मंदिरात भाविकांना सहज पोहोचता येणार आहे, परिणामी पर्यटनाला चालना मिळणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेण्यांचे जतन-संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते महामंडळाची (एमएसआरडीसी) निवड केली आहे. (Pune News) त्या अंतर्गत एकविरा देवीच्या मंदिराचाही समावेश आहे. या मंदिराची पाहणी करण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या ‘वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर या ठिकाणचा रोप वे प्रकल्पही महामंडळाने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला राज्य शासनाची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे पर्यटन विभागाऐवजी आता हा प्रकल्प महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.