Pune : समर्थकाला ‘स्थायी’ समिती मिळण्यासाठी काकडे तर ‘सभागृहनेते’पद आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी बापट आग्रही

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक शंकर पवार यांच्या नावासाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे तर, सभागृह नेतेपदासाठी नगरसेवक महेश लडकत यांच्यासाठी खासदार गिरीश बापट आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर ‘पीएमपीएमएल’ संचालक पदासाठी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. वरील एक पद महिला नगरसेवकांना मिळावे यासाठी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत भाजपचा धक्कादायकरित्या पराभव झाल्यामुळे सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्षपदाचा, श्रीनाथ भिमाले यांना सभागृह नेते पदाचा तर, सिद्धार्थ शिरोळे यांना ‘पीएमपीएमएल’ संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा देण्याचे आदेश भाजपने दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला सावरण्यासाठी नवीन नगरसेवकांचा विचार केला जाणार आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी नगरसेवक शंकर पवार यांचेही नाव चर्चेत आले आहे. त्यांच्यासाठी खासदार संजय काकडे आग्रही असल्याचे समजते. काकडे गटाचे महापालिकेत 30 नगरसेवक आहेत. मागील तीन वर्षांत या गटाला एकही मानाचे पद मिळाले नाही. सभागृह नेतेपदासाठी नगरसेवक महेश लडकत यांचे नाव बापट यांनी लावून धारल्याचे समजते.

‘अभि नहीं तो कभी नहीं’ म्हणत धीरज घाटे यांनीही पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. मागील तीन वर्षांत घाटे यांनाही कोणते मानाचे पद मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने, राजेंद्र शिळीमकर यांच्याही नावाची चर्चा आहे. नगरसेविका मंजुषा नागपुरे, आरती कोंढरे यांच्याही नावाचा विचार सुरू आहे. सर्वच पदे कसबा मतदारसंघांत देण्यात येणार नसून, इतर मतदारसंघांचाही विचार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.