Pune : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोटचेपी भूमिका आजही कायम – प्र. ना. परांजपे

एमपीसी न्यूज : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत (Pune) पाश्चात्य देशांमधील प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मींमध्ये तत्त्वनिष्ठता, एकसंधता होती तर स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील प्रयोगिक रंगभूमीवरील रंगकर्मींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोटचेपी भूमिका घेतल्याचे निरिक्षण ‘समांतर रंगभूमी..पल्याड-अल्याड’ या पुस्तकात लेखकाने नोंदविले आहे. एकसंधता नसणे, बोटचेपी भूमिका घेणे ही परिस्थिती महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीवर आजही दिसून येते, असे प्रतिपादन प्रा. प्र. ना. परांजपे यांनी केले.

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यसमीक्षक माधव वझे यांनी सन 1840 ते 1980 या कालावधीतील पाश्चात्य देशातील आणि 1948 ते 2010 या कालावधीतील मराठी प्रायोगिक-समांतर रंगभूमीचा मागोवा ‘समांतर रंगभूमी..पल्याड-अल्याड’ या पुस्तकाच्या माध्यमातून घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी गणेश सभागृहात प्रा. परांजपे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी गजानन परांजपे, राजहंस प्रकाशनचे संचालक, संपादक डॉ. सदानंद बोरसे व्यासपीठावर होते.

‘पल्याड’च्या प्रायोगिक रंगभूमीविषयी केलेल्या लिखिणासंदर्भात बोलताना प्रा. परांजपे म्हणाले, त्या काळातील सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी विस्तृतपणे मांडल्यामुळे विषयाचे आकलन होणे सोपे जाते. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील ‘अल्याड’च्या प्रायोगिक रंगभूमीवरील अनेक नाटकांच्या विरोधात चळवळी झाल्या, प्रयोग बंद पाडले गेले, हिंसा झाल्या. अशा परिस्थितीत सगळ्यांनी मिळून या विरोधात लढा दिला असे झाले नाही. ते पुढे म्हणाले, आजची परिस्थिती त्या काळापेक्षा वेगळी नाही. विरोधासाठी विरोध होतच असल्याची त्यांनी काही उदाहरणे दिली. या पुस्तकाद्वारे लेखकाने वास्तव मांडून मराठी नाटकाचे प्रेक्षक, वाचकांवर (Pune) उपकारच केले आहेत.

Pune : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने संस्कार जत्रेचे आयोजन

डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, सैद्धांतिक पद्धतीने लिखाण झाल्यास लिखाण क्लिष्ट-रुक्ष होऊ शकते तर रसास्वादाच्या अंगाने लिहिले गेल्यास महत्त्वाचे मुद्दे राहून जातात, परंतु वझे यांचे लिखाण सैद्धांतिक असूनही त्याची मांडणी रसास्वादाच्या अंगाने होते हे त्यांच्या लिखाणाचे सामर्थ्य आहे. सामान्य वाचकाला भिडणारे लिखाण आहे. संदर्भ पुस्तक म्हणून याचे मोल आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी गजानन परांजपे यांनी या पुस्तकातील संपादित उताऱ्यांचे वाचन केले.

पुस्तक लिखाणाविषयी बोलताना माधव वझे म्हणाले, पुस्तकात सैद्धांतिक विचार आहेत; पण मी संज्ञा वापरणे टाळले आहे तर हकिगत सांगतो आहे अशी भूमिका घेऊन मांडणी केली आहे, पण सादरीकरणाविषयी काही लिहिलेले नाही. ते पुढे म्हणाले, हे पुस्तक म्हणजे पाश्चात्य रंगभूमीचा इतिहास नसून असंख्य इंग्रजी ग्रंथ, नियतकालिके, शोधनिबंध यामध्ये विखुरलेली प्रायोगिक-समांतर रंगभूमीची हकिगत संकलन आणि संपादन करून मांडली आहे. मराठी रंगभूमीविषयी काही दस्ताऐवजीकरण झालेले नाही असे त्यांनी नमूद केले. रंगभूमीचे स्वरूप, प्रयोजन हे एक सूत्र घेऊन पाश्चात्य आणि मराठी प्रायोगिक रंगभूमीविषयी मांडणी केली आहे.

प्रा. प्र. ना. परांजपे, डॉ. सदानंद बोरसे, गजानन परांजपे यांचे स्वागत माधव वझे यांनी केले. मानसी वझे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.