Pune: पुण्यातील गणेश मंडळांचा निर्णय सर्वांसाठी अनुकरणीय- अजित पवार

Pune: The decision of Ganesh Mandals in Pune is exemplary for all- Ajit Pawar

एमपीसी न्यूज – पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले आहेत.राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही या निर्णयाचं अनुकरण करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पुणे शहरानं नेहमीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व केलं असून समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा या मानाच्या गणपती मंडळांनी, तसंच भाऊ रंगारी मंडळ, श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व अन्य गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि सार्वजनिक हिताच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय आहे.

विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी झालेली बैठक देखील ‘ऑनलाईन’ झाली. सार्वजनिक उत्सव साधेपणानं साजरा करत असताना महापालिका व पोलिस यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद आहे. पुण्यातील सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींनी दाखवलेलं हे समाजभान कौतुकास्पद आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचा हा निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. राज्यातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.