Pune : पुनर्वसन केल्याशिवाय न्यू कोपरे गावाची जमीन एनडीएला हस्तांतरीत करू नये; युक्रांदची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला (एनडीए) लागून असलेल्या न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वगळलेल्या कुटुंबांचे तातडीचे पुनर्वसन करावे. पुनर्वसन केल्याशिवाय गावाची जमीन एनडीएला हस्तांतरीत करू नये,  अशी मागणी युवक क्रांती दलाने पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, कार्यवाह संदीप बर्वे, राज्य संघटक जांबुवंत मनोहर, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अप्पा अनारसे राज्य सहकार्यवाह , यल्लापा धोत्रे , कोपरे ग्रामस्थ उपस्थित होते.

काही दिवसांपासून स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि एनडीएचे अधिकारी न्यू कोपरे गावात येवून जमीन मोजणी करीत आहेत. न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसन प्रक्रियेतून वगळलेल्या सर्व कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय एनडीएला गावाची जमीन हस्तांतरीत करू नये, अशी मागणी युवक क्रांती दल करीत आहे. या गावाची पुनर्वसन प्रक्रिया गेली २० वर्षे प्रलंबित आहे. या पुनर्वसन प्रक्रियेत वगळण्यात आलेल्या कुटुंबांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची विनंती केली.

याबाबत डॉ. सप्तर्षी यांनी पुनर्वसन प्रकल्पाचे विकसक संजय काकडे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. काकडे यांनी या वंचित कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन न पाळल्याने 17 एप्रिल 2017 ते 5 मार्च 2018 या कालावधीत युक्रांदने काकडे यांचे कार्यालय, पुण्यातील विविध चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 45 वेळा सत्याग्रही आंदोलने केली. त्यामध्ये आंदोलकांना अटकही झाली. न्यायालयात खटला चालला. दीड वर्षे चाललेल्या खटल्यात सर्व सत्याग्रही आंदोलकांची निर्दोष मुक्तता झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी यासंदर्भात आंदोलक आणि विकसक यांची बैठक घेऊन पुनर्वसन प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. युक्रांदने सुमारे 88 वंचित कुटुंबांचे रहिवासी पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.