Pune : चोरांची हिंमत वाढली; पहाटेच्या वेळी दार ठोठावले, घरात घुसले आणि वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – पहाटेच्या वेळी जोरजोरात दार वाजत असल्याने ( Pune) वृद्धाने दार उघडले. त्यानंतर तीन जण जबरदस्तीने घरात आले. त्यांनी घरात झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र  जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 22) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे घडली.
मल्हारी विठ्ठल कुंभारकर (वय 86, रा. वनपुरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंभारकर आणि त्यांच्या पत्नी घरी असताना सोमवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास कुंभारकर यांच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजू लागला. दारात कोणीतरी आले आहे असे समजून कुंभारकर यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर तीन अनोळखी व्यक्ती जबरदस्तीने घरात आले.
त्या व्यक्तींचे वय साधारणपणे 25 ते 30 वर्ष होते. काळे जर्किन आणि काळी पॅन्ट, तसेच तोंडाला बांधून हे चोर कुंभारकर यांच्या घरात आले. त्यांनी कुंभारकर यांच्या पत्नीच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. सासवड पोलीस तपास करीत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.