Pune : शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठीच्या लाँग मार्चला सुरवात

एमपीसी न्यूज : शिक्षण आणि रोजगाराच्या हक्कासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटना व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक महात्मा फुले वाड्यापासून ते मंत्रालयपर्यंतच्या लाँग मार्चला गुरुवारी सुरवात झाली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले विद्यार्थी या लाँग मार्चमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोर्चाला पाठींबा दिला.

सरकारच्या शिक्षण व रोजगाराच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आवाज उठवत शिक्षण-रोजगाराच्या हक्कासाठी फुलेवाडा ते मंत्रालय असे लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाचे शाळा बंद करण्याचे धोरण, आक्षेपार्ह व चुकीचा अभ्यासक्रम निर्मिती, आदिवासी – मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती बंद करणे, शिक्षक भरतीसह संपूर्ण नोकरभरती बंद करणे याविरोधात हा लाँग मार्च काढण्यात आला असून, मुंबई मंत्रालय येथे हा मोर्चा धडकणार आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराचा हक्क मिळावा हा या मोर्चाचा उद्देश आहे. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या मालकीचे, केजी टू पीजी मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत उत्साहाच्या वातावरणात लाँग मार्चला सुरवात झाली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते डॉ. बाबा आढाव, सुरेश खैरनार, पन्नालाल सुराणा, आमदार कपिल पाटील, आमदार सुधीर तांबे, सुभाष वारे, नगरसेविका अश्विनी कदम, अल्लाऊद्दीन शेख, विनय सावंत, संदेश भंडारे, जाकीर अत्तर, प्रमोद दिवेकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.