Pune : कात्रजप्रमाणेच हडपसरचा विकास करणार -वसंत मोरे; एक लाख मतांनी विजयी करण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – कात्रजप्रमाणेच हडपसर मतदारसंघाचा विकास करणार असल्याचे मनसेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी सांगितले. कात्रज, संतोषनगर, सुखासगरनगर, गुजरवाडी फाटा, माऊलीनगर भागांत वसंत मोरे यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली.

अनिकेत खिरीड, मंगेश रासकर, नितीन शेलार, अक्षय धुमाळ, मयूर कुंभार, प्रशांत मोरे, योगेश खैरे, संजय मोरे यावेळी सहभागी झाले होते. हडपसर मतदारसंघातून वसंत मोरे यांना एक लाख मतांनी विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

काल रामटेकडी भागात मोरे यांनी कोपरा सभा घेतली. त्यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हडपसर भागात वाहतूक, कचरा, रस्ते, पाण्याची समस्या बिकट आहे. आपण आमदार झाल्यावर या समस्या तातडीने मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मोरे यांनी दिले.

संपूर्ण पुणे शहराचा कचरा केवळ हडपसर भागात टाकला जातो. हा कचरा शहराच्या चारही बाजूंनी जिरविला जावा, यासाठी आपण वारंवार पुणे महापालिकेत आवाज उठविला. स्थानिक आमदाराने कचऱ्यात मर्सिडीज घेतल्याचाही आरोप त्यांनी केला. आपण ज्यावेळी आमदाराविरोधात आवाज उठवत होतो, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस गप्प का होती? आता मी उठवलेल्या मुद्यांवर राष्ट्रवादी भाषण करीत आहेत, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.

हडपसर, साडेसतरानळी, मांजरी, महमदवाडी, मुंढवा, कोंढवा, केशवनगर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. दररोज पदयात्रेत हजारो नागरिकांची गर्दी आहे. दिवसेंदिवस ही गर्दी वाढत आहे. ही गर्दी पैसे देऊन आणली नाही. मी या लोकांची प्रामाणिकपणे कामे केलीत. त्यामुळे मनसेचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले. कात्रजकारांना आता आमदार म्हणून निवडण्याची संधी प्राप्त झाली आहे. या भागात मी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत.

महापालिकेत केवळ दोन नगरसेवक असतानाही विकासकामे काही कमी झाले नाहीत. कोंढवा भागात नगरसेवक साईनाथ बाबर यांनी अनेक महत्वपूर्ण विकासकामे केली आहेत. तर, संपूर्ण हडपसर मतदारसंघांत मनसेला चांगले वातावरण आहे. त्यामुळे या मतदारसंघावर मनसेचा झेंडा फडकविणारच असल्याचा विश्वास बाबर यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.